महापालिका निवडणुकीत युती होणार की नाही?, अजित पवार यांचं सर्वात मोठं विधान; कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
अजित पवार यांनी आपल्या भाषणात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक तसेच युतीवर भाष्य केलं आहे. त्यांच्या या विधानाची आता सगळीकडे चर्चा होत आहे.

Ajit Pawar : सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. स्थानिक पातळीवर कार्यकर्ते जोमाने तयारीला लागले आहेत. राज्य पातळीवरचे नेतेही ठाणे, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर यासारख्या मोठ्या महापालिकांच्या निवडणुकीत जातीने लक्ष घालत आहेत. स्थानिक पातळीवर त्या-त्या पक्षातील कार्यकर्त्यांनी ही निवडणूक एकहाती लढवण्याची तयारी चालू केली आहे. तर राज्यपातळीवर युती आणि आघाडी यावरही विचार केला जात आहे. दरम्यान, महायुतीतील घटकपक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक एकत्र लढवणार की तिन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकीला समोरे जाणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. असे असतानाच आत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याच युतीवर मोठं भाष्य केलं आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात बोलत होते.
सर्व जाती धर्माच्या लोकांना…
अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी राज्यभर सदस्य नोंदणी अभियान राबवण्याचे निर्देश दिले. पुणे पिंपरी चिंडवडमध्ये १० लाख सदस्य नोंदणी झाली पाहिजे. नाशिकमध्ये पाच लाख झाली पाहिजे. अशा पद्धतीने एक कोटीचं टार्गेट आपण ठेवलं आहे. सर्व जाती धर्माच्या लोकांना सभासद करून घ्या. गरीब असो की डॉक्टर इंजिनियर वकील असो. त्यांना सभासद करून घ्या. प्रत्येकाला आपल्या विचारधारेशी जोडा. तुम्ही लोकांशी संपर्क करा, असं अजित पवार आपल्या कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले.
कार्यकर्त्यांच्या जीवावर आम्ही आमदार, मंत्री, खासदार झालो
आता खरी लढाई पुढच्या काही महिन्यांत आहे. २८ महापालिका, २५ जिल्हा परिषद, २८५ पंचायत समित्या, अनेक नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत. आम्हाला आमदारकी, खासदारकी मिळाली. कार्यकर्त्यांच्या जीवावर आम्ही आमदार, मंत्री, खासदार झालो. आता त्याच कार्यकर्त्यांना वेगवेगळी पदे मिळाली पाहिजेत, अशी अपेक्षाही अजित पवार यांनी व्यक्त केली.
कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर….
आपण कुठेच कमी नसतो. फक्त प्रयत्न करा. प्रयत्नांती परमेश्वर म्हटलं जातं. कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर त्यांच्या त्यांच्या पातळीवर युती करायची की नाही याचा निर्णय घेतला जाईल. आज आपण आपल्या पद्धतीने सगळ्यांनी मनापासून काम केलं पाहिजे. राष्ट्रवादीला कट्टरवाद मान्य नाही. भविष्यातही राष्ट्रवादीला कट्टरवाद मान्य होणार नाही. राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी पालिका निवडणुकीसाठी झोकून देऊन काम केलं पाहिजे. महिला, तरुणांना आपण संधी मोठ्या प्रमाणावर देणार आहोत. पक्ष संघटना वाढवण्यासाठी तरुण, तरुणी, माताभगिनी, डॉक्टर, वकिलांना सोबत घ्यायचं आहे, असं अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं.
जोपर्यंत आम्ही महायुतीत काम करतो तोपर्यंत लाडक्या बहिणींचे पैसे बंद होऊ देणार नाही. हा शब्द लाडक्या बहिणींना देतो. महिना संपल्यावर आदिती मला संपर्क साधते आणि दादा महिलांना पैसे द्या म्हणून सांगते. आम्ही तातडीने पैसे देतो, असंही अजित पवार यांनी निक्षूण सांगितलं.
