शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया दोन ते तीन महिन्यात : अजित पवार

शेतकरी कर्जमाफी कशी द्यायची याबाबत मध्यप्रदेश, राजस्थान यासारख्या राज्यांमधील कर्जमाफीचा अभ्यास सुरु असल्याचं अजित पवार म्हणाले

शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया दोन ते तीन महिन्यात : अजित पवार

नागपूर : शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया दोन ते तीन महिन्यात पूर्ण करणार, असं राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी सांगितलं. हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपुरात अनौपचारिक गप्पांदरम्यान अजित पवार (Ajit Pawar on Farmer loan Waive ) याविषयी म्हणाले.

शेतकरी कर्जमाफी कशी द्यायची याबाबत मध्यप्रदेश, राजस्थान यासारख्या राज्यांमधील कर्जमाफीचा अभ्यास सुरु आहे. कर्जमाफी देताना आधार लिंक करुन कर्जमाफी देता येईल का याची चाचपणी सुरु असल्याचंही अजित पवारांनी सांगितलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार शेतकरी कर्जमाफीची घोषणा कधी करणार याकडे राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीची रोड मॅप तयार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी मिळाली होती.

संपूर्ण कर्जमाफीसाठी 35 हजार 800 कोटी रुपये लागण्याची शक्यता आहे. महत्त्वाचं म्हणजे केंद्राच्या मदतीशिवाय कर्जमाफी देणे शक्य असल्याची माहिती समोर आली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत विविध खात्यांशी संबंधित आढावा घेतला होता.

विमा कंपन्यांकडे 15 हजार कोटी थकित आहेत. कर्जमाफीसाठी निधी उभारण्याचे अनेक पर्याय सरकारकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे आता कर्जमाफीची घोषणा कधी करतात याकडे सर्वांचं लक्ष आहे.

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान शेतकरी कर्जमाफीसाठी आक्रमक झालेल्या भाजप आमदारांनी तिसऱ्या दिवशी विधानभवनाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली होती. ‘सोनियाचा पोपट काय म्हणतो, 25 हजाराला नाही म्हणतो’ असं म्हणत भाजप आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती.

Ajit Pawar on Farmer loan Waive

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI