…तर पवारांची औलाद सांगणार नाही : अजित पवार

सत्तेत आल्यावर चार ते सहा महिन्यांमध्ये तुम्हा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला नाही, तर पवारांची औलाद सांगायचो नाही, असं खुलं आव्हान राष्ट्रवादीचे ज्य़ेष्ठ नेते अजित पवार यांनी बीडमधील परळीत दिलं.

...तर पवारांची औलाद सांगणार नाही : अजित पवार

बीड : विधानसभा निवडणुकांचा हंगाम सुरु झाल्यामुळे दिग्गज नेत्यांच्या तोफा धडाडायला सुरुवात झाली आहे. ‘आमचं सरकार सत्तेवर आलं, की सहा महिन्यात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला नाही, तर पवारांची औलाद सांगायचो नाही’ असं खुलं आव्हान राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिलं. बीडमधील परळीत राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेदरम्यान अजित पवार बोलत होते.

‘तुम्ही म्हणाल अजित पवार, तुम्ही एवढं कडक सांगताय, काय तुम्ही करणार? आमचं सरकार सत्तेवर आलं, तर आम्ही त्यांच्यासारखी कर्जमाफी तुम्हाला करणार नाही. मी आपल्या सर्वांना सांगतो, माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या साक्षीने सांगतो… परळीकरांनो, मी दिलेला शब्द पाळणारा कार्यकर्ता आहे. पहिल्या चार ते सहा महिन्यांमध्ये तुम्हा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला नाही, तर पवारांची औलाद सांगायचो नाही.’ अशी गर्जना अजित पवारांनी केली.

‘आम्ही पहिल्यांदा करुन दाखवलंय, या लोकांची करुन दाखवण्याची दानत नाही. यांच्या काळात 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. माझ्या 16 हजार आया-बहिणी विधवा झाल्या. देवेंद्र फडणवीस साहेब, कोणावर 302 चा गुन्हा दाखल करायचा सांगा. काय केलं होतं त्या शेतकऱ्यांनी? का ही परिस्थिती निर्माण झाली?’ असा सवालही अजित पवारांनी विचारला.

ही निवडणूक माझ्या जीवन-मरणाची आहे, गेल्या 24 वर्षात केलेल्या सेवेचं फळ मला द्या, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनीही आपल्याला विजयी करण्याचं आवाहन केलं.

“या भागाच्या लोकप्रतिनिधी, पालकमंत्री ग्रामविकास मंत्री आणि महिला बालकल्याण मंत्री, ज्यांना दोन वेळा निवडून दिलं, एवढं महत्त्वाचं पद असतानाही, राज्यात, दिल्लीत सत्ता असतानाही आमच्या ताई साहेबांना नागापूरच्या वाण धरणात पाणी का आणता आलं नाही याचं उत्तर कुणी तरी विचारायला हवं. मुंडे साहेबांचं ते स्वप्न होतं की परळीत पंचतारांकित एमआयडीसी असावी, उपमुख्यमंत्री झाल्यावर तो प्रयत्नही झाला, तेव्हा एमआयडीसी झाली नाही. कारण, तेव्हा शेतकऱ्यांनी विरोध केला, पण या सत्ताकाळात एमआयडीसी का आली नाही,” असा सवाल त्यांनी पंकजा मुंडे यांना केला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI