राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे नथुराम गोडसेच्या भूमिकेत! नेतेमंडळी म्हणतात कलाकार म्हणून योग्यच, तर पोस्टवर संमिश्र प्रतिक्रिया

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे नथुराम गोडसेच्या भूमिकेत! नेतेमंडळी म्हणतात कलाकार म्हणून योग्यच, तर पोस्टवर संमिश्र प्रतिक्रिया
अमोल कोल्हे, खासदार

अमोल कोल्हे यांनी साकारलेल्या या भूमिकेनंतर आता संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. त्याबाबत अमोल कोल्हे यांनी फेसबुक पोस्टद्वारे आपली भूमिका स्पष्ट केलीय. 'मी व्यक्तिगत पातळीवर गांधीजींची हत्या तसेच नथुराम उदात्तीकरण या दोन्हीसाठी समर्थक नाही तरी समोर आलेल्या भूमिकेस न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे', असं अमोल कोल्हे म्हणाले.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सागर जोशी

Jan 20, 2022 | 7:42 PM

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे यांच्या भूमिकेतून घराघरात आणि जनतेच्या मनात पोहोचलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) आपल्या अजून एका भूमिकेमुळे चर्चेत आले आहेत. ‘मैंने गांधी को क्यों मारा’ या चित्रपटाच्या माध्यमातून खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी नथूराम गोडसेची (Nathuram Godse) भूमिका साकारली आहे. हा सिनेमा महिना अखेरिस प्रदर्शित होणार आहे. मात्र, या अमोल कोल्हे यांनी साकारलेल्या या भूमिकेनंतर आता संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. त्याबाबत अमोल कोल्हे यांनी फेसबुक पोस्टद्वारे (Facebook Post) आपली भूमिका स्पष्ट केलीय. ‘मी व्यक्तिगत पातळीवर गांधीजींची हत्या तसेच नथुराम उदात्तीकरण या दोन्हीसाठी समर्थक नाही तरी समोर आलेल्या भूमिकेस न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे’, असं अमोल कोल्हे म्हणाले.

एक अभिनेता म्हणून पाहिलं जावं – टोपे

तर आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी अमोल कोल्हे यांच्या या भूमिकेकडे कलाकार आणि प्रेक्षक या नात्यानं पाहा असं आवाहन केलंय. राजेश टोपे म्हणाले की, ‘Why I killed Gandhi’ हा साधारणपणे 45 मिनिटाचा चित्रपट आहे. हा चित्रपट प्रदर्शित होतोय असं कळतंय. आजच अमोल कोल्हे माझ्याकडे तास दोन तास होते. त्यांच्या मनातील एक मोठा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे जो ते पुण्यात करु पाहत आहेत, त्यबाबतची बैठक होती. त्यानंतर त्यांनी मला ती क्लिपही दाखवली ज्यात त्यांनी नथुराम गोडसेचा रोल केलेला आहे. अमोल कोल्हे यांची ओळख ही एक अत्यंत चांगला, लोकप्रिय, गुणी अभिनेता म्हणून आहे. आपल्या सर्वांनाच अभिमान वाटावा असा गुणी कलाकार आपल्या महाराष्ट्रात आहे. त्यांची संभाजी नावाची मालिका सुरु होती. त्यावेळी सर्वजण ती मालिका पाहत. एक अभिनेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे. त्यांनी नथुराम गोडसेचा रोल जरी केला असला तरी तो एक अभिनेता म्हणून त्याकडे पाहिलं जावं, अशी विनंती मला महाराष्ट्रातील जनतेला करायची आहे. निश्चितप्रकारे आपण त्यांच्या कलेचं कौतुक केलं पाहिजे, असं राजेश टोपे यांनी मांडलं आहे.

‘कलाकार हा कलाकार, त्याला राजकारणाशी जोडणं योग्य नाही’

‘ते कलाकार आहेत. एक कलाकार आपली कलाकारी त्यांना मिळणाऱ्या रोलवर करतो. त्यांनी देवाचा रोल केला तर तो काही देव होत नाही. हिरो, गुंड, डान्सर किंवा कॉमेडियन असू द्या… कलाकार हा कलाकार असतो. त्याला राजकारणाशी जोडणं योग्य नाही’, असं मत अस्लम शेख यांनी व्यक्त केलं आहे.

कोल्हेंच्या पोस्टवर संमिश्र प्रतिक्रिया

एकीकडे महाविकास आघाडीतील नेत्यांनी अमोल कोल्हे यांच्या भूमिकेकडे एक कलाकार म्हणून पाहा असं म्हटलंय. तर कोल्हे यांनी केलेल्या पोस्टवर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. काहीजणांनी राजकीय नेता आणि कलाकार या दोन वेगळ्या बाजू आहेत असं म्हटलं आहे. तर कोल्हे हे आता केवळ कलाकार नाहीत. ते देशाच्या सर्वोच्च सभागृहाचे एक सदस्य आहेत. त्यामुळे महात्मा गांधी यांच्या हत्येचं जर उदात्तीकरण होत असेल तर गांधी हत्या योग्य होती असंच लोक समजतील, असंही मत काहींनी व्यक्त केली आहे.

अमोल कोल्हे यांची फेसबुक पोस्ट काय?

मी आणि नथुराम गोडसे ही भूमिका –

2017 साली केलेला “Why I killed Gandhi” हा सिनेमा Limelight या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असं समजलं आणि अनेकांनी विचारलं डाॅक्टर तुम्ही नथुराम गोडसे या भूमिकेत? उत्तरादाखल मला कुठेतरी वाचलेलं वाक्य आठवलं- “हा महाराष्ट्र कीर्तनानं पूर्णपणे घडला नाही आणि तमाशानं पूर्णपणे बिघडला नाही!” या वाक्यातील नकारात्मक सूर बाजूला ठेवला तर मला या वाक्यात एक सकारात्मक गोष्ट जाणवते ती म्हणजे “Reel लाईफ” आणि “Real लाईफ” यातील फरक स्पष्ट करणारी सीमारेषा अधोरेखित करणं.

कलाकार म्हणून भूमिका साकारत असताना काही भूमिका आव्हानात्मक असतातच आणि त्यांच्या विचारधारेशी सुद्धा आपण सहमत असतो आणि त्या साकारताना समाधानही मिळतं परंतु काही अशा भूमिका अचानक समोर येतात ज्या विचारधारेशी आपण सहमत नसतो पण कलाकार म्हणून त्या आव्हानात्मक असतात. अशीच ही भूमिका नथुराम गोडसे. मी व्यक्तिगत पातळीवर गांधीजींची हत्या तसेच नथुराम उदात्तीकरण या दोन्हीसाठी समर्थक नाही तरी समोर आलेल्या भूमिकेस न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. कलाकार म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर आणि व्यक्ती म्हणून विचारस्वातंत्र्याचा!
याच मनमोकळेपणाने आपण या कलाकृतीकडे पहावं ही अपेक्षा!

काय आहे सिनेमाची खबरबात?

30 जानेवारी 1948 या दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची नथुराम गोडसे यांनी हत्या केली होती. दरम्यान, 30 जानेवारी या दिवसाचा धागा पकडत येत्या 30 तारखेलाच हा सिनेमाता प्रदर्शित होणार आहे. 30 जानेवारी, 2022 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांना बघायला मिळू शकेल.

इतर बातम्या : 

‘हां मैने गांधी का वध किया’, नेहमी छत्रपतींची भूमिका साकारणाऱ्या कोल्हेंच्या ‘नथूराम गोडसे’त नेमकं काय आहे?

School reopen : राज्यातील शाळा 24 जानेवारीपासून सुरु; विचार न करता राज्य सरकारचा निर्णय? पुणे, औरंगाबादेतील शाळांचं काय?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें