अमरावतीत एका बापाच्या 48 मुलांचं मतदान!

  • Updated On - 11:41 am, Mon, 7 December 20 Edited By: Team Veegam
अमरावतीत एका बापाच्या 48 मुलांचं मतदान!


अमरावती: एका ‘बापा’च्या तब्बल 48 मुलांनी आज मतदानाचा हक्क बजावला.  शंकरबाबा पापडकर यांच्या 48 मुलांनी अमरावती येथील परतवाडा इथे मतदान केलं.

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात विदर्भातील अमरावती, अकोला आणि बुडणाला मतदारसंघात मतदान आहे. अमरावती मतदारसंघातील परतवाडा मतदान केंद्रातील 48 मुलांच्या वडिलांचं एकच नाव आहे. कधीकाळी रस्त्यावर टाकलेल्या या मुलांना शंकर बाबा पापडकर यांनी पालकत्व दिलं. त्यांनी दिव्यांग मुलांना माणूस म्हणून जगवलं आणि लोकशाहीत प्रत्येकाला असलेला मतदानाचा अधिकार मिळवून दिला.

सर्वांचे मतदान कार्ड बनवले, या सर्व 48 दिव्यांगं मतदारांना वडील म्हणून स्वत:चं नाव दिलं. आम्ही मतदान करणार, मग तुम्ही का नाही? असा प्रश्न हे दिव्यांग मतदार विचारत आहेत.

अमरावती लोकसभा मतदारसंघ

अमरावती लोकसभा मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीकडून नवनीत राणा यांचा सामना शिवसेनेचे विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ यांच्याशी होत आहे.

विदर्भातील अमरावती लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा गड आहे. अमरावतीतून सेनेचे नेते आनंदराव अडसूळ तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर त्यांना टक्कर देण्यासाठी युवा स्वाभिमानच्या नवनीत राणा मैदानात आहेत.

आनंदराव अडसूळ यांच्यासारख्या नेत्याला टक्कर देण्यासाठी नवनीत राणा यांनी जोरात प्रचार केला. आघाडीचाही त्यांना पाठिंबा आहे. एक मॉडेल, अभिनेत्री ते लोकसभेच्या उमेदवार, हा नवनीत राणा यांचा प्रवास आहे. यामागे त्यांची मेहनत आहे.  ही लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी संपूर्ण ताकद पणाला लावली आहे.