काँग्रेस प्रवेशाचं वृत्त धादांत खोटं : आनंदराज आंबेडकर

काँग्रेस प्रवेशाचं वृत्त धादांत खोटं : आनंदराज आंबेडकर

मुंबई : माझ्या काँग्रेस प्रवेशाचं वृत्त धादांत खोटं असल्याचं स्पष्टीकरण रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी दिले आहे. काही वृत्तसंस्थांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश’ अशा मथळ्याखाली बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. त्यानंतर स्वत: आनंदराज आंबेडकर यांनी पुढे येत यासंदर्भातील गोंधळ दूर केला आहे. काँग्रेस प्रवेशाचं वृत्त धादांत खोटं असल्याचं स्पष्टीकरण आनंदरा आंबेडकरांनी दिले.

आनंदराज आंबेडकर नेमकं काय म्हणाले?

“काँग्रेस प्रवेशाचं वृत्त धांदात खोटे आहे. या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही. ज्यांनी ही बातमी दिली, त्यांच्याकडून आंबेडकरी चळवळ बदनाम करण्याचा प्रयत्न होतो आहे. काँग्रेसमध्ये कुठलाही प्रवेश केलेला नाही. या बातमीत कुठलाही तथ्य नाही.”, असे स्पष्टीकरण रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी दिले.

तसेच, “दिल्लीत आमची ताकद नाही. दिल्लीत आम्ही कुठलाही उमेदवार दिलेला नाही. आम्ही दिल्लीचं युनिटही बरखास्त केलंय. मी गेल्या आठ दिवसापासून मुंबईत आहे, दिल्लीत जायचा प्रश्न नाही.” असेही आनंदराज आंबेडकर यांनी सांगितले.

वंचित बहुजन आघाडीकडूनही स्पष्टीकरण

“आनंदराज आंबेडकरांची कॉग्रेस प्रवेशाची बातमी निराधार आणि खोटी आहे. बातमी प्रकाशित करणाऱ्या वृत्तसंस्थांवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकू. काँग्रेस प्रवेश करणारे उदितराज आहेत, आनंदराज नव्हेत.” असे स्पष्टीकरण वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांनी दिले.

काय आहे प्रकरण?

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी दिल्लीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला, असे कालपासून काही वृत्तसंस्थांनी बातम्या प्रसिद्ध केल्या. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच गोंधळ निर्माण झाला. नव्या राजकीय समीकरणांबद्दलही चर्चा सुरु झाली. मात्र, हे वृत्त खोटे असल्याचेच आता स्वत: आनंदराज आंबेडकरांनी स्पष्ट केल्याने या प्रकरणावर पडदा पडला आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI