सचिन वाझेंबाबतचा फडणवीसांचा ‘तो’ दावा कपोलकल्पित!, सिद्ध करुन दाखवा, अनिल परबांचं आव्हान

सचिन वाझेंना सेवेत घेण्यासाठी खुद्द उद्धव ठाकरे आपल्याशी बोलले होते. तसंच शिवसेनेचे काही मंत्री आपल्याला भेटल्याचा दावा फडणवीसांनी केला होता. त्यावरुन आता शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी फडणवीसांना आव्हान दिलं आहे.

सचिन वाझेंबाबतचा फडणवीसांचा 'तो' दावा कपोलकल्पित!, सिद्ध करुन दाखवा, अनिल परबांचं आव्हान
सचिन वाझे प्रकरणावरुन देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांना अनिल परब यांचं प्रत्युत्तर

मुंबई : मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणात NIAच्या कोठडीत असलेले सचिन वाझेंवरुन भाजप आणि शिवसेनेत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आपण मुख्यमंत्री असताना सचिन वाझेंना सेवेत घेण्यासाठी खुद्द उद्धव ठाकरे आपल्याशी बोलले होते. तसंच शिवसेनेचे काही मंत्री आपल्याला भेटल्याचा दावा फडणवीसांनी केला होता. त्यावरुन आता शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी फडणवीसांना आव्हान दिलं आहे.(Anil Parab’s challenge after allegations made by Devendra Fadnavis in Sachin Waze case)

सचिन वाझेला घेण्यासाठी शिवसेनेने मागणी केली, या गोष्टी कपोलकल्पित आहेत. फडणवीस यांनी अॅडव्होकेट जनरल यांचं मत घेतल्याचं सांगितलं. त्यांनी कधी लेखी मागितले आणि अॅडव्होकेट जनरल यांनी कधी लेखी दिलं, हे फडणवीसांना दाखवावं, असं आव्हान अनिल परब यांनी दिलं आहे. तसंच कुणाचीही चौकशी करावी. कुठल्याही चौकशीला सामोरे जाण्यास आम्ही तयार आहोत. आम्ही काही घाबरुन कुठली चौकशी करु नये, अशी विनवणी करीत नाही. कुठलीही चौकशी करायला यंत्रणा मोकळी आहे. आम्ही सहकार्य करायला तयार आहोत, असंही परब म्हणालेत. दरम्यान, परमवीर सिंह यांच्या बदलीबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेलं कारण, यावर परब काही बोलले नाहीत.

फडणवीस नेमकं काय म्हणाले?

बुधवारी मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांची उचलबांगडी केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. 2018 मध्ये आपण मुख्यमंत्री असताना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फोन केला होता. तेव्हा निलंबित असलेले वाझे यांना पोलीस दलात पुन्हा घ्यावं, असं ठाकरे म्हणाले होते. तसंच शिवसेनेचे काही मंत्रीही त्यासाठी आपल्याकडे आले होते, असं फडणवीस यांनी सांगितलं.

फडणवीस म्हणाले, वसई-विरारमध्ये खंडणी मागणाऱ्यांचं जे रॅकेट सापडलं होतं. त्यात एपीआय सचिन वाझे यांचं नाव होतं. 2004 मध्ये खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यामुळे वाझे यांना उच्च न्यायालयाच्या आदेशानं निलंबित करण्यात आलं होतं. 2007 मध्ये वाझे यांनी व्हीआरएससाठी अर्ज केला होता. पण त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा, निलंबनाची कारवाई होऊन चौकशी चालू असल्यामुळे व्हीआरएस नाकारण्यात आली.

‘सचिन वाझेंसाठी उद्धव ठाकरेंचाही फोन’

2018 मध्ये मी मुख्यमंत्री असताना सचिन वाझेंना सेवेत पुन्हा घेण्यासाठी शिवसेनेनं माझ्यावर दबाव टाकला. उद्धव ठाकरे यांनी स्वत: फोन केला होता. त्यांचे काही मंत्रीही माझ्याकडे आले होते. पण मला वाझे यांची संपूर्ण माहिती असल्यामुळे मी त्याबाबत अॅडव्होकेट जनरल यांच्याशी चर्चा केली. ही चर्चा लेखी स्वरुपात नव्हती. तेव्हा उच्च न्यायालयाच्या आदेशानं निलंबन झालं असल्यामुळे आणि वाझेंची चौकशी सुरु असल्याने त्यांना सेवेत घेणं योग्य ठरणार नसल्याचं अॅडव्होकेट जनरल यांनी मला सांगितलं. त्यामुळे मी वाझेंना पुन्हा सेवेत घेतलं नाही.

पण, आता कोरोनाचं कारण देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने त्यांना सेवेत घेतलं. इतकच नाही तर पीआयची बदली करुन एपीआय असलेल्या वाझेंना सीआययूचे प्रमुख करण्यात आलं. खरंतर त्यांना वसुली अधिकारी म्हणून ठेवण्यात आलं. मुंबईतील डान्स बारला त्यांच्या काळात खुली सूट देण्यात आली, असा गंभीर आरोप फडणवीसांनी बुधवारी केला आहे.

संबंधित बातम्या :

आमच्या अधिकाऱ्यांकडून गंभीर चुका; निष्पक्ष चौकशीसाठी पोलीस आयुक्तांची बदली: अनिल देशमुख

Param Bir Singh : हे ठाकरे सरकारचे पाप, मुंबई पोलिसांची इतकी बदनामी कधीच झाली नाही, भाजपचा हल्लाबोल

Anil Parab’s challenge after allegations made by Devendra Fadnavis in Sachin Waze case

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI