भोकरदनमध्ये जाऊन खोतकर दानवेंना म्हणाले, हॅप्पी बर्थ डे

भोकरदनमध्ये जाऊन खोतकर दानवेंना म्हणाले, हॅप्पी बर्थ डे

जालना : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना श्रद्धांजली वाहिली. रावसाहेब दानवे यांचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे दानवेंना शुभेच्छा देण्यासाठी अर्जुन खोतकर यांनी भोकरदनमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली. मात्र गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे दुःखद निधन झालंय. देशभरात दुःखाचं वातावरण आहे. त्यामुळे दानवेंनी जन्मदिन साध्या पद्धतीने साजरा करत फक्त शुभेच्छा स्वीकारल्या.

स्वच्छ प्रतिमा आणि शेवटच्या श्वासापर्यंत ऑन ड्युटी असलेला नेता देशाने गमावल्याची भावना यावेळी रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केली.

शिवसेना-भाजप यांच्या युतीमध्ये सर्वात मोठा तिढा जालन्याच्या जागेचा होता. इथे अर्जुन खोतकरांनी दानवेंविरोधात दंड थोपटले होते. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीनंतर खोतकरांनी बंड थंड केलं. औरंगाबादमध्ये काल युतीचा मेळावा झाला. या मेळाव्यातील जाहीर भाषणात खोतकरांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.

माघार घेतल्यानंतर विजयासाठी पूर्ण ताकदीने कामाला लागणार असल्याचंही खोतकरांनी स्पष्ट केलं. जालना हा भाजपला बालेकिल्ला मानला जातो. पण यावेळी युतीमध्ये ही जागा शिवसेनेला सोडावी, अशी खोतकरांची मागणी होती. शिवाय खोतकरांचे कार्यकर्तेही या मागणीसाठी आक्रमक होते. पण खोतकरांनी आता दानवेंच्या प्रचारासाठी सुरुवात केली आहे.

Published On - 5:20 pm, Mon, 18 March 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI