राष्ट्रवादीचा अंतर्गत सर्व्हे, लोकसभेच्या ‘या’ 10 जागा जिंकण्याची खात्री

राष्ट्रवादीचा अंतर्गत सर्व्हे, लोकसभेच्या 'या' 10 जागा जिंकण्याची खात्री

मुंबई : लोकसभेच्या निवडणुका अगदी काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी हालचाली वेगवान केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यातील लोकसभा मतदारसंघांमध्ये अंतर्गत चाचपणी केली. राज्यातील 48 पैकी 10 जिंकण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसला विश्वास आहे. राज्यात सध्या राष्ट्रवादीचे एकूण पाच खासदार असून, या पाचही जागा पक्षाकडेच राहतील, असाही विश्वास अंतर्गत चाचपणीतून पक्षाला मिळाला आहे.

बारामती, माढा, कोल्हापूर, सातारा आणि भंडारा-गोंदिया या पाच लोकसभा मतदारसंघात सध्या राष्ट्रवादीचे खासदार आहेत.

  1. बारामती – सुप्रिया सुळे
  2. कोल्हापूर – धनंजय महाडिक
  3. सातारा – उदयनराजे भोसले
  4. माढा – विजयसिंह मोहिते पाटील
  5. भंडारा-गोंदिया – मधुकर कुकडे

राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार या पाचही जागा 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही राखतील, असा विश्वास राष्ट्रवादीच्या अंतर्गत चाचपणीतून समोर आला आहे. खरेतर या पाचपैकी बारामती, कोल्हापूर, माढा आणि सातारा या चार जागा 2014 साली मोदी लाट असतानाही राष्ट्रवादीने जिंकल्या होत्या. शिवाय, या जागा राष्ट्रवादीचे बालेकिल्लेच मानले जातात.

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात 2014 साली नाना पटोले भाजपच्या तिकिटावर विजयी झाले होते. मात्र, त्यानंतर पक्ष नेतृत्त्वावर नाराजी आणि शेतकऱ्यांच्य मुद्द्यांवर त्यांनी सत्ताधारी भाजपमधून बाहेर पडत, खासदारकीचाही राजीनामा दिला. इथे पोटनिवणूक झाली, त्यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुकर कुकडे यांना उमेदवारी देण्यात आली आणि मधुकर कुकडे जिंकले. त्यामुळे आता ही जागाही राष्ट्रवादीकडे आहे.

राष्ट्रवादीला विजयाची खात्री असलेल्या इतर पाच जागा कोणत्या?  

राष्ट्रवादीला विद्यमान खासदारांच्या जागांसह इतर पाच जागांवरही विजयाची खात्री आहे. त्यामध्ये रायगड, शिरुर, बुलडाणा, परभणी आणि मावळच्या जागांचा समावेश आहे.

रायगड – इथून 2014 साली सुनील तटकरे यांनील लोकसभा निवडणूक लढवली होती आणि निसटता पराभव झाला. अनंत गिते यांच्यासारख्या सेनेच्या बलाढ्य नेत्याला तटकरेंनी पार नमवलं होतं. त्यामुळे यावेळी रायगडमधून तटकरे बाजी मारु शकतात, असा विश्वास राष्ट्रवादीच्या अंतर्गत चाचपणीत व्यक्त करण्यात आला आहे.

मावळ – पुणे आणि रायगड या दोन जिल्ह्यात पसरलेला हा लोकसभा मतदारसंघ सध्या शिवसेनेकडे आहे. शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे मावळणधून खासदार आहेत. इथून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार निवडणूक लढण्याची शक्यता आहे. पार्थ पवार निवडणूक लढल्यास मावळची जागा राष्ट्रवादीला मिळण्याचा अंदाज वर्तवला जातो आहे.

या दोन महत्त्वाच्या जागांसह शिरुर, बुलडाणा आणि परभणी या लोकसभा मतदारसंघातही राष्ट्रवादी काँग्रेस बाजी मारु शकते, असा अंदाज राष्ट्रवादीच्या अंतर्गत चाचपणीतून समोर आले आहे. शिरुर मतदारसंघात शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील विद्यमान खासदार आहेत, तर बुलडाण्यातूनही शिवसेनेचे प्रतापराव जाधव विद्यमान खासदार आहेत. राष्ट्रवादीकडून बुलडाण्यातून राजेंद्र शिंगणे यांचं नावाची, तर शिरुरमधून विलास लांडे यांच्या नावाची चर्चा आहे.

एकंदरीत राज्यात लोकसभेसाठी राष्ट्रवादीने तगडी फौज उतरवण्याची तयारी केली असून, जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा अंदाजही व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीच्या अंतर्गत चाचपणीने तर राष्ट्रवादीला ‘आशावादी’ केल्याचेच चित्र आहे.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI