अशोक चव्हाणांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब, काँग्रेसची आठवी यादी जाहीर

अशोक चव्हाणांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब, काँग्रेसची आठवी यादी जाहीर

नवी दिल्ली : काँग्रेसने लोकसभेसाठी पुन्हा एकदा 38 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात महाराष्ट्रातलं एकमेव नाव आहे आणि ते म्हणजे विद्यमान खासदार अशोक चव्हाण यांचं. अशोक चव्हाणांना पुन्हा एकदा बालेकिल्ल्यातून म्हणजे नांदेडमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अशोक चव्हाण यावेळी लढणार की त्यांच्या पत्नीला तिकीट मिळणार याबाबत तर्कवितर्क लावले जात होते, अखेर त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झालंय. भाजपकडून नांदेडमध्ये प्रताप पाटील चिखलीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे नांदेड मध्ये अशोक चव्हाण विरुद्ध भाजपाचे प्रताप पाटील चिखलीकर यांच्यात लढत होणार.

काँग्रेसने आठ याद्यातून आतापर्यंत 216 उमेदवारांची घोषणा केली आहे. आठव्या यादीमध्ये मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधून दिग्विजय सिंह, कर्नाटकातून मल्लिकार्जुन खर्गे यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांच्या नावाचाही समावेश आहे. काँग्रेसने शनिवारी रात्री उशिरा ही यादी जाहीर केली.

राज्यातल्या या जागांवर काँग्रेसचा उमेदवार जाहीर होणं बाकी

रामटेक, हिंगोली, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, पुणे, सांगली, या जागांवर काँग्रेसने अजून उमेदवार जाहीर केलेला नाही. काँग्रेसचे दिवंगत नेते गुरुदास कामत यांचा मतदारसंघ मुंबई उत्तर पश्चिममधून लढण्याची मागणी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली होती. पण याला कामत गटाचा विरोध होता. त्यामुळे या दोन जागांचा तिढा कसा सुटतो ते महत्वाचं आहे. शिवाय सांगलीची जागा स्वाभिमानीला सोडली जाण्याची शक्यता आहे. हिंगोलीतून विद्यमान खासदार राजीव सातव यांनी माघार घेतल्यामुळे नवा उमेदवार कोण याकडे लक्ष लागलंय. पुणे आणि रामटेकच्या उमेदवारावरही काँग्रेसमध्ये चर्चा सुरु आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI