…तर शेतकऱ्यांना घेऊन दिल्लीत धडकणार; बच्चू कडूंचा केंद्राला 3 डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम

शेतकऱ्यांच्या मागण्या 3 डिसेंबरपर्यंत मंजूर करा, नाही तर शेतकऱ्यांना घेऊन दुचाकीवरून दिल्लीत धडक देऊ, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. (bacchu kadu warns central government over farmers protest)

  • सुरेंद्रकुमार आकोडे, टीव्ही 9 मराठी, अमरावती
  • Published On - 16:56 PM, 30 Nov 2020

अमरावती: कृषी कायद्यांच्याविरोधात पंजाब-हरियाणातील शेतकऱ्यांनी दिल्लीत धडक दिली असून चार दिवस झाले तरी सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केलेल्या नाहीत. त्यामुळे राज्याचे जलसंपदा व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही आता केंद्र सरकार विरोधात एल्गार पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या 3 डिसेंबरपर्यंत मंजूर करा, नाही तर शेतकऱ्यांना घेऊन दुचाकीवरून दिल्लीत धडक देऊ, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. (bacchu kadu warns central government over farmers protest)

बच्चू कडू यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना हा इशारा दिला. शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त आहेत. त्यावर तोडगा काढा. 3 डिसेंबरपर्यंत तोडगा न काढल्यास आम्ही हजारो शेतकऱ्यांना घेऊन दुचाकीवरून बैतूलमार्गे दिल्लीला धडक देऊ. मी प्रत्यक्ष उपस्थित राहून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देईल, असं त्यांनी सांगितलं.

केंद्र सरकारने सर्व शेतकऱ्यांना सन्मानाने दिल्लीत येऊ द्यावं आणि त्यांच्याशी प्रामाणिकपणे संवाद साधून तोडगा काढावा. यवतमाळ येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 50 टक्के नफा देऊन हमी भाव देतो असं सांगितलं होतं. तसं वचनच मोदींनी शेतकऱ्यांना दिलं होतं. त्यांनी त्याचं पालन करावं, असं आवाहनही त्यांनी केलं.

शेतकरी आंदोलन तामिळनाडू पर्यंत

केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या चार दिवसांपासून पंजाब-हरियाणातील शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन केलं आहे. आता हे आंदोलन केवळ पंजाब-हरियाणाच्या शेतकऱ्यांपुरतंच मर्यादित राहिलं नसून देशभर पसरत चाललं आहे. तामिळनाडूतील शेतकऱ्यांनीही आज जोरदार आंदोलन केलं. तामिळनाडूतील शेतकऱ्यांनी रस्त्यावर ठिय्या दिला. त्यानंतर कागदाचे विमान बनवून त्यावर आपल्या मागण्या लिहून हे विमान हवेत उडवलं.

दरम्यान, दिल्ली- गुरुग्राम बॉर्डरवर शेतकऱ्यांनी चक्काजाम केला आहे. त्यामुळे या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मात्र, हजारो शेतकरी सीमेवर आल्याने पोलिसांचीही तारांबळ उडाली आहे. (bacchu kadu warns central government over farmers protest)

 

संबंधित बातम्या:

इंग्लंडचा दिग्गज क्रिकेटर भारतातील शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ मैदानात, सरकारला विचारला जाब

कायद्यांना नाव शेतकऱ्यांचे पण फायदा अब्जाधीश मित्रांचा, प्रियांका गांधींचे मोदी सरकारवर टीकास्त्र

शेतकरी आंदोलकांकडून दिल्ली जाम करण्याचा इशारा; नड्डांच्या घरी रात्री उशिरा बैठक

(bacchu kadu warns central government over farmers protest)