“संजय राऊत यांचं वक्तव्य चुकीचं, भविष्यात अशा गोष्टी खपवून घेणार नाही”

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संजय राऊत यांच्या इंदिरा गांधींबद्दलच्या वक्तव्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे (Controversial statement of Sanjay Raut on Indira Gandhi).

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:37 PM, 16 Jan 2020

मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संजय राऊत यांच्या इंदिरा गांधींबद्दलच्या वक्तव्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे (Controversial statement of Sanjay Raut on Indira Gandhi). शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी इंदिरा गांधी यांच्याबद्दल केलेलं विधान मागे घेतलं आहे. काँग्रेस यापुढे आपल्या नेत्यांबद्दल होणारी अशी वक्तव्यं खपवून घेणार नाही, असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं. यावेळी त्यांनी संजय राऊत यांनी संबंधित वक्तव्य मागे घेतलं असून यावर आता काय बोलणार असं म्हणत या प्रकरणावर पडदाही टाकण्याचा प्रयत्न केला (Controversial statement of Sanjay Raut on Indira Gandhi).


बाळासाहेब थोरात म्हणाले, “भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या संदर्भातील संजय राऊत यांचं वक्तव्य चुकीचं होतं. त्यावर आमची नाराजी होती. ही नाराजी आम्ही उद्धव ठाकरे यांना कळवली. त्यानंतर संजय राऊतांनी त्यांचं विधान मागे घेतलं. त्यामुळे वादावर पडदा पडला. भविष्यात त्यांनी विचारपूर्वक विधानं करावीत. आमच्या महान राष्ट्रीय नेत्यांबद्दलचा तथ्यहीन अनादर काँग्रेस खपवून घेणार नाही हे सर्वांनीच लक्षात ठेवावे.”


इंदिरा गांधी या देशाच्या महान नेत्या होत्या. त्यांनी 1975 मध्ये मुंबईतील आणि देशातील गुन्हेगारीचं कंबरडं मोडण्याचं काम केलं. मुंबईतील स्मगलरांचे रॅकेट त्यांनी पूर्णपणे उद्ध्वस्त केलं. ज्या करीमलालाबद्दल बोललं जातंय त्याच्यासकट हाजी मस्तान, युसुफ पटेलसारख्या अनेक गुन्हेगारी जगताशी संबंधित व्यक्तींना इंदिरा गांधींनी जेलमध्ये टाकून त्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या, असंही थोरात यांनी नमूद केलं.

“गुंडांची महामंडळावर नियुक्ती करणाऱ्या फडणवीसांनी राजकारणातील गुन्हेगारीवर बोलू नये”

बाळासाहेब थोरात यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही हल्ला चढवला. ते म्हणाले, “देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना वर्षा या शासकीय निवासस्थानी कुख्यात गुंडाला भेटल्याची छायाचित्रे महाराष्ट्राने पाहिली आहेत. आपल्या सत्ताकाळात मुन्ना यादव सारख्या गुंडांची महामंडळावर नियुक्ती करून त्याला संरक्षण देणाऱ्या फडणवीसांनी राजकारणातील गुन्हेगारीबाबत बोलू नये.”


विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राईचा पर्वत करण्याची आपली सवय सोडावी. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करून त्यांच्या पक्षाने गमावलेली प्रतिमा सावरण्यासाठी त्यांनी इंदिरा गांधींचा अवमान करण्याचा प्रयत्न करू नये, असंही थोरात म्हणाले.