Belgaum Lok Sabha Bypoll | बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतदानाची धामधूम, शुभम शेळके की मंगला अंगडी, फैसला होणार

केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांचं निधन झाल्यामुळे बेळगावमध्ये लोकसभेची पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. (Belgaum Lok Sabha Bypoll Live Update)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 8:47 AM, 17 Apr 2021
Belgaum Lok Sabha Bypoll | बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतदानाची धामधूम, शुभम शेळके की मंगला अंगडी, फैसला होणार
voting

बेळगाव : केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांचं निधन झाल्यामुळे बेळगावमध्ये लोकसभेची पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. या निवडणुकीत भाजपने मंगला अंगडी यांना उमेदवारी दिली आहे. तर महाराष्ट्र एकीकरण समितीने अवघ्या 26 वर्षीय शुभम शेळके यांना मैदानात उतरवले आहे. बेळगाव लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात 10 जण उतरले आहेत. त्यामुळे यात नेमकं कोण विजयी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Belgaum Lok Sabha Bypoll Election Voting Live Update)

जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीची जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. यासाठी 18 लाख 13 हजार 538 मतदार मतदानाचा हक्‍क बजावणार आहेत. अर्थात उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या तारखेपर्यंत झालेली मतदार नोंदणी ही मतदानासाठी पात्र ठरणार आहे. बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी एकूण 18 लाख 13 हजार 538 मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदार 9 लाख 11 हजार 25 असून महिला मतदार 9 लाख 2 हजार 455 आहेत. इतर मतदारांची संख्या 58 आहे. उमेदवारी अर्ज माघार घेऊन झालेली मतदार नोंदणी मतदानासाठी पात्र असणार आहेत.

निवडणुकीच्या रिंगणात 10 उमेदवार

बेळगाव लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात 10 जण आहेत. बेळगाव लोकसभेसाठी एकूण 23 जणांनी 33 उमेदवारी अर्ज दाखल केले होते. अर्जमाघारीच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेच्या के. पी. पाटील यांच्यासह 8 जणांनी अर्ज माघार घेतले आहेत. त्यामुळे सध्या निवडणुकीच्या रिंगणात 10 जण आहेत. काँग्रेसतर्फे सतीश जारकीहोळी आणि भाजपतर्फे मंगला अंगडी निवडणूक लढवत आहेत. समितीचे उमेदवार शुभम शेळके यांना चिन्हावरील आक्षेपानंतरही ‘सिंह’ हेच निवडणूक चिन्ह मिळाले आहे

मतदारसंघ काय सांगतो?

बेळगाव लोकसभा मतदारसंघांमध्ये बेळगाव उत्तर, बेळगाव दक्षिण, बेळगाव ग्रामीण, अरभावी, गोकाक, बैलहोंगल, रामदुर्ग, सौंदत्ती-यल्लमा आदी एकूण 8 विधानसभा मतदारसंघ असून त्यापैकी बैलहोंगल आणि बेळगाव ग्रामीणमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. तर उर्वरित 6 मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे या पोटनिवडणुकीत मराठी भाषिक नेमकं काय करणार? याकडे दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकचंही लक्ष लागलं आहे. (Belgaum Lok Sabha Bypoll Election Voting Live Update)

लिंगायत किंगमेकर

बेळगाव लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक लोकसंख्या लिंगायत मतदारांची आहे. एकूण 18 लाख 13 हजार 538 मतदारांपैकी लिंगायत मतदार 6.25 लाख आहेत. यापैकी 3.25 लाख मराठी मतदार आहेत. 1.80 लाख कुरबर, 65 हजार विणकर, 40 हजार जैन, 40 हजार ब्राह्मण, 2 लाख मुस्लिम आणि 2 लाख मागासवर्गीय मतदार आहेत. भाजपचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा हे लिंगायत समाजाचे आहेत. त्यामुळे ही मते भाजपच्या पारड्यात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जातीय समीकरण काय सांगते?

मंगला अंगडी या लिंगायत समाजातील आहेत. त्यांचे पत्नी सुरेश अंगडी यांना लिंगायत आणि मराठी मते मोठ्या प्रमाणावर मिळत होते. त्यामुळे मंगला यांची सर्व भिस्त या दोन्ही मतदारांवर आहे. तर काँग्रेसचे जारकीहोळी हे वाल्मिकी नायक समाजातील आहे. या समाजाची मते खूप कमी आहेत. मात्र, काँग्रेसचं वर्चस्व अधिक असल्याने त्यांची सर्व भिस्त पारंपारिक मतांवर आहे. शुभम शेळके मराठी असून त्यांना मराठी, मुस्लिम आणि दलित-मागासवर्गीयांची मते मिळतील अशी आशा वाटत असल्याचं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे.

बॅलेटवर भाजप उमेदवार पहिल्या, काँग्रेस दुसऱ्या तर समिती उमेदवार नवव्या क्रमांकावर

बॅलेटवरील नावांचा क्रम निश्चित करताना राष्ट्रीय पक्ष, राज्यस्तरीय पक्ष, नोंदणीकृत अमान्यता पक्ष आणि आद्याक्षरानुसार अपक्ष उमेदवार असा लावला जातो. त्यानुसार बेळगाव मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मंगला अंगडी यांचे नाव पहिल्या क्रमांकावर असेल. बेळगाव लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सतीश जारकीहोळी यांचे नाव ईव्हीएम मशीनवरील बॅलेट पेपरवर 2 नंबरवर, तर युवा समितीचे उमेदवार शुभम शेळके यांचे नाव 9 नंबरवर येणार आहे.

10 उमेदवारांचा ईव्हीएम मशीनवरील बॅलेट पेपरवर नंबर

1. मंगला अंगडी (भाजप) – कमळ
2. आमदार सतीश जारकीहोळी (काँग्रेस) – हात/पंजा
3. विवेकानंद बाबू घंटी (कर्नाटक राष्ट्र समिती) – शिट्टी
4. व्यंकटेश्वर महास्वामीजी (हिंदुस्थान जनता पार्टी) – ट्रॅक्टर चालविणारा शेतकरी
5. सुरेश बसाप्पा मरीलिंगण्णावर (कर्नाटक कामगार पक्ष) – ऑटो रिक्षा
6. अप्पासाहेब कुरणे (अपक्ष) – कप बशी
7. गौतम यमन्नाप्पा कांबळे (अपक्ष) – पंचिंग मशिन
8. नागप्पा कळसन्नवर (अपक्ष) – गॅस सिलेंडर
9. शुभम शेळके (युवा समिती/अपक्ष) – सिंह
10. श्रीकांत पडसलगी (अपक्ष) – प्रेशर कुकर

(Belgaum Lok Sabha Bypoll Election Voting Live Update)

संबंधित बातम्या : 

महाराष्ट्र एकीकरण समितीचे शुभम शेळके जिंकणार का?, काय आहे बेळगाव लोकसभा मतदारसंघाचं गणित?; वाचा सविस्तर