“मला कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन”, भाजप नेत्याची जीभ घसरली

"मला कोरोनाची लागण झाली तर मी ममता बॅनर्जी यांना मिठी मारेन", असं वक्तव्य भाजप नेते अनुपम हाजरा (BJP leader Anupam Hazra) यांनी केलं.

"मला कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन", भाजप नेत्याची जीभ घसरली

कोलकाता : भाजपचे नवनियुक्त राष्ट्रीय सचिव आणि माजी आमदार अनुपम हाजरा (BJP leader Anupam Hazra)  यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. “मला कोरोनाची लागण झाली तर मी ममता बॅनर्जी यांना मिठी मारेन”, असं अनुपम हाजरा म्हणाले.

पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगना जिल्ह्यातील बरईपूर येथे भाजप कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात उपस्थित कार्यकर्त्यांपैकी बऱ्याच जणांनी चेहऱ्यावर मास्क लावले नव्हते. या बैठकीनंतर अनुपम हाजरा यांना पत्रकारांनी याबाबत प्रश्न विचारला असता त्यावर उत्तर देताना हाजरा यांची जीभ घसरली.

हेही वाचा : “एक वेळ माझा गळा चिरा, पण…” ममता बॅनर्जी आक्रमक

“आमचे कार्यकर्ते कोरोनापेक्षा जास्त मोठ्या संकटांशी लढत आहेत. ते ममता बॅनर्जी यांच्याविरोधात लढत आहेत. ते कोरोना महामारीने प्रभावित झालेले नाहीत. त्यांना कुणाचीही भीती वाटत नाही”, असं हाजरा (BJP leader Anupam Hazra)  म्हणाले.

“जर मला कोरोनाची लागण झाली तर मी ममता बॅनर्जी यांना मिठी मारेन. कारण या संकटात त्यांनी कोरोनाबाधितांना खूप चुकीची वागणूक दिली आहे. कोरोनाबाधित मृतदेहांवर रॉकेल टाकून जाळलं आहे. अशा प्रकारची वर्तवणूक आपण कुत्रे आणि मांजरींसोबतदेखील करत नाही”, असा आरोप अनुपम हाजरा यांनी केला.

यावेळी त्यांनी तृणमूल काँग्रेसवरदेखील निशाणा साधला. “तृणमूल काँग्रेसच्या लोकांनी एक थप्पड मारली तर तुम्ही चार थप्पड मारा, पण कोणत्याही परिस्थितीत बूथ लूटू देऊ नका”, असं आवाहन हाजरा यांनी भाजप कार्यकर्त्यांना केलं.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI