चाकणकर म्हणाल्या, गाल आणि थोबाड सुद्धा रंगवू, दरेकर म्हणतात, गाल सर्वांनाच रंगवता येतात

राष्ट्रवादी काँग्रेसला गरिबाच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष आहे, असं वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिरुरमध्ये केलं होतं.

चाकणकर म्हणाल्या, गाल आणि थोबाड सुद्धा रंगवू, दरेकर म्हणतात, गाल सर्वांनाच रंगवता येतात
Rupali Chakankar_Praveen Darekar


शिरुर, पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसला गरिबाच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष आहे, असं वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिरुरमध्ये केलं होतं. त्यानंतर आता राष्ट्रवादीकडून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी जशास तसं उत्तर दिलं आहे. तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दरेकरांचं वक्तव्य अश्लील अर्थ नाही, असं म्हटलं. वादांची ही मालिका कधी थांबणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

प्रवीण दरेकर नेमकं काय म्हणाले होते?

पुणे जिल्ह्यातील शिरूरमध्ये आद्य क्रांतिकारी राजे उमाजी नाईक यांचा जयंती सोहळा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उपस्थित होते. यावेळी आपल्या भाषणात प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला.

राष्ट्रवादी काँग्रेसला गरीब लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ‘रंगलेल्या गालाचा’ मुका घेणारा पक्ष आहे. सुभेदारांचा पक्ष, कारखानदारांचा पक्ष, बँकावाल्यांचा पक्ष, उद्योगपतींचा पक्ष आहे. मात्र भाजप हा सर्वसामान्यांचा, सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे असं प्रवीण दरेकर म्हणाले.

दरेकरांच्या बोलण्याला राष्ट्रवादीत सुरु असलेल्या पक्षप्रवेशची पार्श्वभूमी होती. सुप्रसिद्ध लावणी कलावंत सुरेखा पुणेकर आणि शांताबाई फेम गायक संजय लोंढे यांच्यासह काही कलाकार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत.

रुपाली चाकणकरांचा दरेकरांवर हल्लाबोल

दरम्यान, प्रवीण दरेकर यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी जोरदार हल्लाबोल केला. “तुमच्या बोलण्यावरुन तुमच्या पक्षाची संस्कृती काय आहे हे दिसून येतं. प्रवीणजी दरेकर आपण ज्या पद्धतीचं वक्तव्य केलंय, त्याच्याबद्दल आपण महिलांची माफी मागावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महिलांचा अपमान करणाऱ्यांचं गाल आणि थोबाड सुद्धा रंगवू शकतो याची सुद्धा जाणीव आपण ठेवावी”, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.

प्रवीण दरेकरांचं प्रत्युत्तर

मी कुणाच्या वक्तव्याला फारसं महत्व देत नाही. गाल सर्वांनाच रंगवता येतात, कुणीही अतिरेकी भाषा करु नये. ती मराठीत म्हण आहे, मात्र माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. राष्ट्रवादी पक्ष हा धनदांडग्यांना जवळ करणारा पक्ष आहे असा त्याचा अर्थ होतो. उमाजी नाईक यांच्या जयंतीला लोक स्वयंस्फूर्तीने उपस्थित झाले. त्यांच्यावर कारवाई झाली ती योग्य म्हणता येणार नाही. मात्र गर्दी केल्याबाबत हीच कारवाई राष्ट्रवादीच्या मेळाव्यावर, शिवसेनेच्या आंदोलनावर का नाही, असा प्रश्न प्रवीण दरेकर यांनी विचारला.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

दरम्यान, याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. चंद्रकांत पाटील म्हणाले, “वाक्यप्रचार आपण उच्चारत असतो, त्याचा अर्थ वेड घेवून पेडगावला जावं लागेल. राष्ट्रवादीला श्रीमंतच जवळचे वाटतात गरीब नाही. प्रवीण दरेकरांच्या मनात अश्लील अर्थ नव्हता”

आयोजकांवर गुन्हा दाखल

दरम्यान काल पुणे जिल्ह्यातील शिरूरमध्ये आद्य क्रांतिकारी राजे उमाजी नाईक यांच्या जयंती सोहळा कार्यक्रम आयोजित करणााऱ्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा पार पडला होता. या मेळाव्याला मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता, तर अनेकांच्या तोंडावर मास्कदेखील नव्हता. कोरोना प्रतिबंधक नियमावली दिली असताना त्याला आयोजकांकडून तिलांजली देण्यात आली. याप्रकरणी मच्छिंद्र बोडरे आणि दिनेश चव्हाण या आयोजकांवर कोविड नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

VIDEO : प्रवीण दरेकर नेमकं काय म्हणाले होते? 

संबंधित बातम्या 

सुरेखा पुणेकरांचा राष्ट्रवादी प्रवेश, दरेकर म्हणतात, राष्ट्रवादी रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष

हिंदू महिला, मुलींना जबरदस्तीने हिजाब घालायला लावणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करा; दरेकरांची गृहमंत्र्यांकडे मागणी

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI