
“महायुतीमधल्या पक्षातील कार्यकर्त्यांचा आपसात होणारा पक्ष बदल या स्थानिक पातळीवरच्या घटना आहेत आणि याला एवढे मोठे स्वरूप द्यायची काही गरज नाही.माझ्या मते ही बाब एकनाथ शिंदेंकडे तक्रार करण्यायोग्य नाही” असं विधान परिषदेतील भाजपचे आमदार संजय केनेकर यांनी म्हटलं आहे. आजच “शिवसेना, भाजप, एनसीपीमध्ये अलिखित करार झालाय. पक्षांचे लोक आप आपसात घ्यायचे नाहीत तरी संभाजी नगरात पैशांची मस्ती काहींना आलीय. त्या जीवावर फोडाफोडी केली जातेय. त्या बाबत अहवाल आम्ही शिंदे साहेबांना देणार आहोत” असं संजय शिरसाट म्हणाले.
“आम्ही आमच्यात या म्हणून कोणाला घरातून जाऊन आणले नाही, किंवा कुणाला निमंत्रण दिले नाही. आपले काही लोक महायुतीत दुसरीकडे जात असतील आणि तेच महायुतीच्या पक्षाकडे येत असतील तर दुसरीकडे गेल्यापेक्षा ते बरे आहे” असं संजय केनेकर म्हणाले.
“काँग्रेस किंवा उद्धव ठाकरेंकडे महायुतीतील लोक जाण्यापेक्षा महायुती हा आपला परिवार आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे आपल्याकडे काम करणारी मंडळी महायुतीत राहिली पाहिजे. आपला चांगला माणूस विरोधकांच्या नादी लागून त्यांच्याकडे जाऊ नये अशी आपली भूमिका असते” असं संजय केनेकर यांनी सांगितलं. “कोणी महायुतीतून जात असेल तर त्यांना आम्ही समजावून सांगतो की,त्यांनी महायुतीत राहावे. संजय शिरसाट आणि आमचा चांगला समन्वय आहे आणि खालच्या कार्यकर्त्यांमुळे आमच्यामध्ये काही वैमनस्य होईल असे मला वाटत नाही” असं संजय केनेकर म्हणाले.
आम्ही अजिबात कोणाला फोडलेलं नाही
“अशा पक्षप्रवेशामुळे महायुतीला काही डॅमेज होईल अशी भावना आमच्या महायुतीत कोणत्याही नेत्यांमध्ये नाही. आम्ही अजिबात कोणाला फोडलेलं नाही. निमंत्रण दिले नाही, कोणाला घरात ओढून आणलेलं नाही किंवा कोणाला बळजबरी उचलून नेले नाही” असं संजय केनेकर यांचं म्हणणं आहे. “बहुतेक राजेंद्र जंजाळ काही नाराज नाहीत. त्यांचं शिरसाट यांच्यासोबत खूप चांगलं सुरु असेल. त्यांच्यामध्ये खूप एकोपा होता आणि एक नाण्याच्या त्या दोन बाजू होत्या” असा टोमणा मारला.