कसं काय दादा बरं हाय का? दिल्ली भेटीचं ऐकलं ते खरंय का? चंद्रकांत पाटलांवर पक्षश्रेष्ठी नाराज?

पक्षश्रेष्ठी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. दोन दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीत पक्षश्रेष्ठींनी आपली नाराजी व्यक्त करत, पाटील यांनी पक्ष संघटना मजबूत करण्याचा सल्ला दिला आहे.

कसं काय दादा बरं हाय का? दिल्ली भेटीचं ऐकलं ते खरंय का? चंद्रकांत पाटलांवर पक्षश्रेष्ठी नाराज?
चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप

नवी दिल्ली : राज्यात आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था तसेच विधान परिषदेच्या निवडणुका आणि भाजपाची संघटनात्मक बांधणी या पार्श्वभूमीवर पक्षाच्या दिल्लीमधील मुख्यालयात दोन दिवसांपूर्वी बैठक झाली. या बैठकीला भाजपाचेे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, संघटन सरचिटणीस बी.एल. संतोष, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती होती. दरम्यान या बैठकीमध्ये राज्यातील भाजपाच्या कामगिरीबाबत पक्षश्रेष्ठींमधून नाराजीचे सूर उमटले असल्याची चर्चा आहे. पक्षाकडून चंद्रकांत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून सुरू असलेल्या कार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. 

…म्हणून पक्षश्रेष्ठी नाराज?

राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून भाजपाकडून सातत्याने सरकार पडणार असल्याच्या वावड्या उठवल्या जात आहेत. मात्र सरकार स्थिर असल्याचे दिसून येते. याचा नकारात्मक परिणाम हा जनतेचा मनामध्ये निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यातील भाजपा नेत्यांनी असे काहीही न बोलता, राज्यात पक्षांचे संघटनअधिक मजबूत कसे होईल यावर लक्ष केंद्रीत करावे असा सल्ला पाटील यांना पक्षश्रेष्ठींकडून  देण्यात आल्याची महिती समोर आली आहे. राज्यात भाजपाचे संघटन कमजोर होत असल्याचे निरीक्षण देखील यावेळी नड्डा यांनी नोंदवले आहे.

पक्षाच्या संघटनाकडे दुर्लक्ष?

चंद्रकांत पाटील हे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून त्यांनी पक्ष मजबूत करण्यासाठी कोणताही विशेष असा प्रयत्न केल्याचे दिसत नाही. त्यांचा प्रवास पुणे ते कोल्हापूर एवढ्यापर्यंतच मर्यादित राहिला आहे. त्यांनी राज्यातील इतर जिल्ह्यांना भेटी दिल्या नाहीत. तसेच नुकताच कोरोना लसीकरणाने शंभर कोटींचा टप्पा ओलांडला, याबाबत देखील राज्यातील भाजपाकडून म्हणावी अशी जगजागृती करण्यात आली नाही. त्यामुळे चंद्रकांत पाटलांवर पक्षश्रेष्ठी नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पाटील यांच्यावर नाराज असल्यानेच काही दिवसांपूर्वी अमित शाह यांनी त्यांना भेट नाकारली.

‘मला फक्त सूत्राचे नाव सांगा’

दरम्यान याबाबत चंद्रकांत पाटलांना विचारले असता, त्यांनी संताप व्यक्त केला आहे. तुम्हाला नेहमी सगळी माहिती ही सूत्रांकडूनच मिळत असते. मला त्या सूत्राचे नाव सांगा, मग मी त्याला सांगतो पाटील काय चीज आहे ते. माझ्याबद्दल पक्षश्रेष्ठींचे काय मत आहे. मी राज्यात काम करतो की नाही, मी काय काम करायला पाहिजे? हे निर्णय घेण्यासाठी चंद्रकांत पाटील समर्थ असल्याचे त्यांनी म्हटले.

संबंधित बातम्या 

Rajesh tope : राज्याला कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा किती धोका? कोणते नवे नियम? आरोग्यमंत्री राजेश टोपे बैठकीआधी म्हणाले…

संधी मिळताच जनता आघाडीला फेकून देईल, चंद्रकांत पाटलांनी केला ठाकरे सरकारचा पंचनामा

‘कोरोनाला रोखण्यासाठी जे आवश्यक ते सर्व करा,’ मुख्यमंत्री ठाकरेंचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश

Published On - 8:53 am, Mon, 29 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI