मुख्यमंत्र्यांसाठीच काम करणार, भाजप बंडखोराचा फडणवीस सरकारला पाठिंबा

भविष्यात सरकारला पाठिंबा देण्याचा किंवा सरकार स्थापन करण्यासाठी बेरजा आणि जुळवाजुळव करण्याचा प्रश्न निर्माण झाला. तर मी फडणवीसांसोबत राहीन, यावर बोईसरचे भाजप बंडखोर संतोष जनाठे ठाम आहेत

मुख्यमंत्र्यांसाठीच काम करणार, भाजप बंडखोराचा फडणवीस सरकारला पाठिंबा
अनिश बेंद्रे

|

Oct 15, 2019 | 8:00 AM

पालघर : बंडखोरांना भाजपमध्ये थारा दिला जाणार नाही, असा सज्जड दम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतरही भाजप बंडखोराने फडणवीस सरकारला पाठिंबा (BJP rebel supports Devendra Fadnavis) देण्याची भूमिका कायम ठेवली आहे. बोईसर मतदारसंघातील बंडखोर संतोष जनाठे यांचा भाजपला पाठिंबा देण्याचा हट्ट कायम आहे.

भविष्यात पक्षाने संधी दिली, तर मी फडणवीस सरकारमध्ये काम करण्यास इच्छुक असेन. बंडखोरांना थारा देणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. तरी त्यांनी स्वीकारलं तर ठीक. नाहीतर मी अपक्ष राहीन आणि काम मात्र त्यांच्यासाठीच करेन, अशी भूमिका संतोष जनाठे यांनी घेतली आहे.

भविष्यात सरकारला पाठिंबा देण्याचा किंवा सरकार स्थापन करण्यासाठी बेरजा आणि जुळवाजुळव करण्याचा प्रश्न निर्माण झाला. आणि त्यांनी नाही सांगितलं तरी मी त्यांच्याच सोबत राहीन, असं म्हणत संतोष जनाठे ठाम राहिले आहेत. बोईसर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार विलास तरे यांच्याविरोधात जनाठेंनी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

भाजपच्या बंडखोर आमदाराची पक्षाला सोडचिठ्ठी

विलास तरे हे बहुजन विकास आघाडीच्या तिकीटावर आमदार होते. मात्र त्यांनी राजीनामा देत काही महिन्यांपूर्वीच शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. आयात नेत्याला उमेदवारी मिळाल्यामुळे बोईसरमध्ये काही जणांमध्ये नाराजीचं वातावरण होतं. त्यातच भाजपमधून जनाठेंनी बंडाचं निशाण फडकावलं. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही त्यांची बंडखोरी शमली नाही.

आपल्या राजीनाम्याच्या शेवटच्या ओळीतही ‘भविष्यात पक्षाने संधी दिली, तर मी फडणवीस सरकारमध्ये काम करण्यास इच्छुक असेन’ असा उल्लेख केल्याचं संतोष जनाठे (BJP rebel supports Devendra Fadnavis) यांनी सांगितलं. भविष्यात वेळ पडल्यास अपक्ष निवडून आलेल्या बंडखोरांबाबत मुख्यमंत्री काय भूमिका घेतात, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

पक्षाने सांगूनही अपक्ष उमेदवारी अर्ज मागे न घेणाऱ्या बंडखोरांची भाजपने हकालपट्टी केली होती. चरण वाघमारे, गीता जैन, बाळासाहेब ओव्हाळ आणि दिलीप देशमुख या उमेदवारांना आधी पक्षाने बाहेर काढलं. त्यानंतर गोंदियात बंडखोरी आणि पक्षविरोधी कारवाई केलेले भाजपचे पदाधिकारी विनोद अग्रवाल, भाऊराव उके, रतन वासनिक, छत्रपाल तुरकर, अमित बुद्धे यांच्यासह पिंपरी-चिंचवड येथील सीमा सावळे, दक्षिण नागपूर येथील सतीश होले, मेळघाट येथील अशोक केदार, गडचिरोली जिल्यातील गुलाब मडावी आणि यवतमाळमधून आमदार राजू तोडसम (आर्णी) यांना पक्षातून काढून टाकलं.

शिवसेना आणि भाजप युतीमध्ये अनेक जणांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या सर्वांनी उमेदवारी मागे घ्यावी, असं आवाहन पक्षाकडून करण्यात आलं. पण न ऐकल्यामुळे पक्षाने निलंबनाची कारवाई केली. तर कल्याणचे आमदार नरेंद्र पवार यांनी कारवाई आधीच राजीनामा देणं पसंत केलं.

शिवसेनेकडूनही पाच बंडखोरांना पक्षातून हाकलण्यात आलं आहे. उस्मानाबादमधील अजित पिंगळे आणि सुरेश कांबळे, माढा मतदारसंघातील महेश चिवटे, तर सोलापूरमधील प्रवीण कटारिया आणि जिल्हाप्रमुख महेश कोठे यांच्यावर बंडखोरीची कारवाई करण्यात आलेली आहे.मात्र तृप्ती सावंत, राजुल पटेल आणि सुरेश भालेराव या तिघा बंडखोरांबाबत शिवसेनेने ‘आस्ते कदम’ची भूमिका घेतली आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें