शिवसेनेला पाठिंब्यासाठी काँग्रेसची नवी अट?

सत्तास्थापनेला मदत हवी असल्यास शिवसेनेने एनडीएबाहेर पडावे, अशी अट काँग्रेस घालण्याची शक्यता आहे.

शिवसेनेला पाठिंब्यासाठी काँग्रेसची नवी अट?

नवी दिल्ली : शिवसेना एनडीए अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडली, तरच काँग्रेस पाठिंबा देईल, अशी अट ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी शरद पवारांसोबतच्या भेटीत घातल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे शिवसेनेला सत्तास्थापन करण्यासाठी काँग्रेस सशर्त पाठिंबा (Congress Conditionally Supports Shivsena) देण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट काही दिवसांपूर्वी राजधानी दिल्लीत झाली होती. या भेटीत महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर दोघांमध्ये चर्चा झाली होती. यावेळी सोनिया गांधी यांनी शिवसेनेला सशर्त पाठिंब्याची तयारी दर्शवल्याची माहिती आहे.

‘महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने सोनिया गांधींसोबत चर्चा केली. महाराष्ट्रात स्थिर सरकार स्थापन करण्यावर ही चर्चा झाली. मुंबईमधील नेत्यांशी चर्चा करुन पुन्हा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहे. सरकार बनवण्यासाठी आमच्याकडे संख्या नाही, असं पवारांनी भेटीनंतर सांगितलं होतं.

पवारांच्या भूमिकेने सर्वांचीच अडचण, भाजप, शिवसेना आणि काँग्रेसही बुचकळ्यात, सत्ताचक्राच्या केंद्रस्थानी एकमेव शरद पवार!

राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून 14 दिवस उलटले. मात्र, सत्तास्थापनेचा तिढा अद्यापही कायम आहे. बहुमत मिळवूनही भाजप-शिवसेना युतीने सत्ता स्थापन केलेली नाही. दोन्ही पक्षांमध्ये 50-50 च्या फॉर्म्युल्यावरुन खडाजंगी पाहायला मिळत आहे. 9 नोव्हेंबरपर्यंत सत्ता स्थापन करणं आवश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

शरद पवारांनी आपण विरोधात बसणार असल्याचं म्हटलं असलं, तरी त्यांच्या दिल्ली भेटीने अनेक पर्यायांची चाचपणी सुरु असल्याचं दिसतं.

राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा दर्शवण्यासाठी अनुकूलता दर्शवली आहे. मात्र सेनेला थेट पाठिंबा देणं काँग्रेससाठी अडचणीचं (Congress Conditionally Supports Shivsena) आहे. शिवसेनेला थेट पाठिंबा दर्शवला तर अन्य राज्यात त्याचा परिणाम होऊ शकतो.

जर काँग्रेसने बाहेरुन पाठिंबा द्यायचं ठरवलं, म्हणजेच बहुमत चाचणीवेळी जर गैरहजर राहायचं ठरवलं, तरी मोठी अडचण होणार आहे. कारण काँग्रेसकडे 44 आमदारांचं संख्याबळ आहे. जर काँग्रेसचे आमदार बहुमतावेळी गैरहजर राहिले तर 288 वजा 44 म्हणजे 244 वर सदस्यसंख्या येईल. त्यामुळे बहुमताचा आकडा 145 वरुन 123 वर येईल. मात्र शिवसेना+ राष्ट्रावादीचे 56 + 8 अपक्ष + राष्ट्रवादीचे 54 यांचं संख्याबळ 118 पर्यंत पोहोचतं. पण भाजप आणि मित्रपक्षांची संख्या 121 पर्यंत जाते. त्यामुळे काँग्रेसने भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी बहुमत चाचणीवेळी गैर राहणंही अडचणीचे आहे. शिवसेनेला थेट पाठिंबा देणेही अडचण आणि गैर राहून बाहेरुन पाठिंबा देणेही अडचणीचे आहे.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI