…म्हणून चंद्रकांत पाटील यांची टीव्ही 9 च्या अँकरला मंत्रीपदाची ऑफर

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम |

Updated on: Aug 09, 2019 | 11:53 PM

भारतीय राजकारणात कोण कुणाला काय ऑफर देईन याचा काहीही अंदाज लावणं कठीण आहे. याचाच प्रत्यय टीव्ही 9 च्या स्टुडिओत आला. हा सर्व घटनाक्रम "नायक" या हिंदी चित्रपटाला शोभावा असाच होता.

...म्हणून चंद्रकांत पाटील यांची टीव्ही 9 च्या अँकरला मंत्रीपदाची ऑफर

मुंबई : भारतीय राजकारणात कोण कुणाला काय ऑफर देईन याचा काहीही अंदाज लावणं कठीण आहे. याचाच प्रत्यय टीव्ही 9 च्या स्टुडिओत आला. हा सर्व घटनाक्रम “नायक” या हिंदी चित्रपटाला शोभावा असाच होता. नायक चित्रपटात जसं पत्रकाराच्या प्रश्नावर मुख्यमंत्री पत्रकारालाच मुख्यमंत्रीपदाची ऑफर देऊन तुम्ही सांभाळून पाहा,असं म्हणतात. तसाच काहीसा प्रकार शुक्रवारी (9 ऑगस्ट) राज्याचे महसूल मंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला. टीव्ही 9 चे अँकर ऋषी देसाई यांनी पुरातील व्यवस्थापनात सरकारला आलेल्या अपयशावर कठोर प्रश्न विचारले असता चंद्रकांत पाटील यांनी त्यांना थेट मंत्रीपदाचीच ऑफर दिली.

टीव्ही 9 चे अँकर ऋषी देसाई यांनी सरकार आणि प्रशासनाने हवामान खात्याच्या अंदाजकडे दुर्लक्ष करत आवश्यक आपत्ती व्यवस्थापन केलं नसल्याच्या मुद्द्यावर बोट ठेवलं. देसाई म्हणाले, “मागील 9 दिवसांपासून सांगली-कोल्हापूरमध्ये मुसळधार पाऊस होत आहे. मात्र, एनडीआरएफची पथकं केवळ 4 दिवसांपासून पूरग्रस्त भागात येण्यास सुरुवात झाली. याचं नियोजन करण्यात सरकार आणि प्रशासन कमी पडलं असं वाटत नाही का? भाजपचे आमदार शंभुराजे देसाई म्हणतात की पोलीस प्रमुख साताऱ्यात दिसत नाहीत याचा अर्थ काय? एक जबाबदार लोकप्रतिनिधी स्वतःच्याच सरकारवर प्रश्न उपस्थित करत आहेत.”

यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, “सुरुवातीला पाऊस कमी होता. लोकांना वारंवार आवाहन करुनही घरं सोडण्यास नकार दिला. लोक बाहेर पडायला तयार नव्हते. पाऊस वाढला, गावं पाण्याखाली जाऊ लागले त्यावेळी एनडीआरएफची गरज पडली. काही गावं गुरुवारी (8 ऑगस्ट) आम्हाला बाहेर काढा म्हणत होते.” तसेच असं असल्यास एनडीआरएफची पथकं आज बोलावणार की आधी असा उलट प्रश्नही चंद्रकांत पाटील यांनी विचारला. तुम्हाला तरी या परिस्थितीचा अंदाज येऊ शकतो का असाही प्रश्न केला. यावर ऋषी देसाई यांनी सरकारमध्ये तुम्ही आहात, आपत्कालीन यंत्रणा तुमच्याकडे आहे तुम्ही तुमची जबाबदारी ढकलू शकत नाही, असं ठणकावलं. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी टीव्ही 9 चे अँकर देसाई यांना थेट सरकारमध्ये येण्याचे आमंत्रण दिले. ते म्हणाले, “मी आज तुम्हाला महाराष्ट्राचा मंत्री करतो. तुम्ही मंत्रीमंडळात येऊन उद्या किती पाऊस पडू शकतो हे सांगा? चंद्रकांत पाटील यांच्या या बेजबाबदार वक्तव्यानंतर देसाई यांनी त्यांना हा नायक चित्रपट नसल्याचे म्हणत सुनावले.

पंचगंगेचं पाणी धोक्याची पातळी ओलांडत असतानाही प्रशासन ही माहिती नागरिकांपर्यंत पोहचवण्यात अपयशी पडलं. त्यानंतरही आवश्यक मदत आणि बचावकार्य पुरवण्यात अपयश आलं. मात्र, असं असूनही सरकारचे मंत्री सरकार कमी पडलं नसून सरकारने सर्व मदत केल्याचाच दावा करत आहेत. तर दुसरीकडे नागरिक आपले जीव मुठीत घेऊन महापुराला तोंड देत आहेत. यात अनेक नागरिकांचे जीवही गेले आहेत. अनेकजण अद्यापही बेपत्ता आहे. मात्र, सरकार आपली चूक कबूल करण्यास तयार नसल्याचेच या निमित्ताने समोर आले आहे.


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI