कोथरुडमधून चंद्रकांत पाटलांच्या उमेदवारीची चर्चा, ब्राह्मण महासंघाचा विरोध

ब्राह्मण समाजाचं सर्वाधिक मतदान असलेल्या मतदारसंघात (Chandrakant Patil Kothrud) इतर समाजातील आयात उमेदवार आम्हाला चालणार नाही, असा पवित्रा ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी घेतला आहे.

कोथरुडमधून चंद्रकांत पाटलांच्या उमेदवारीची चर्चा, ब्राह्मण महासंघाचा विरोध

पुणे : कोथरुड विधानसभा मतदारसंघातून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil Kothrud) यांना उमेदवारी देण्यास ब्राह्मण महासंघाने तीव्र विरोध केला आहे. ब्राह्मण समाजाचं सर्वाधिक मतदान असलेल्या मतदारसंघात (Chandrakant Patil Kothrud) इतर समाजातील आयात उमेदवार आम्हाला चालणार नाही, भाजपने ब्राह्मण समाजाचा उमेदवार दिला नाही तर आम्ही ब्राम्हण महासंघाचा स्वतंत्र उमेदवार उभा करु, असा पवित्रा ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी घेतला आहे.

विद्यमान आमदारही नाराज

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पुण्यातील कोथरुड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीची चर्चा आहे. यानंतर कोथरुडच्या विद्यमान भाजप आमदार मेधा कुलकर्णी यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मेधा कुलकर्णी स्वतः कार्यकर्त्यांसह मुंबईला येऊन त्यांची बाजू मांडणार असल्याची माहिती आहे. चंद्रकांत पाटलांच्या उमेदवारीच्या चर्चेनंतर मेधा कुलकर्णींच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची गर्दी जमायला सुरू झाली. यावेळी मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी देण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली.

भाजपचे उमेदवार अजून जाहीर झालेले नसले तरी विधानपरिषदेवर असलेले चंद्रकांत पाटील यावेळी विधानसभा लढण्याची दाट शक्यता आहे. यासाठी कोथरुड विधानसभा मतदारसंघाची निवड झाल्याचंही बोललं जातंय. पण यामुळे विद्यमान आमदारावरच संक्रांत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पुण्यातील आठही जागा जिंकू : गिरीष बापट

पुण्यातील आठ जागांपैकी तीन जागांवर खांदेपालट झाली असून पाच जागा कायम ठेवण्यात आल्याची माहिती आहे. कोथरूड मतदारसंघातून विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता आहे. त्यांच्याऐवजी पालकमंत्री आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. तर कसब्यात महापौर मुक्ता टिळक यांना निवडणुकीत उतरवलं जाण्याची शक्यता आहे.

शिवाजीनगर मतदारसंघात विद्यमान आमदार विजय काळे यांच्या ऐवजी सिद्धार्थ शिरोळे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडल्याची चर्चा आहे. यासंदर्भात बोलताना खासदार गिरीश बापट यांनी निवडून येण्याची क्षमता हा सर्वात महत्त्वाचा निकष असल्याचं म्हटलंय. राजकारणात पक्षाचा निर्णय महत्त्वाचा असतो. चंद्रकांत पाटील किंवा जो कोणी पक्षाचा उमेदवार असेल त्यांना निवडून आणू. पुण्यातील आठही मतदारसंघात उमेदवार निवडून येतील, असा दावा खासदार गिरीश बापट यांनी केला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *