चंद्राबाबूंचा सुपडासाफ, भाजपने लोकसभेसोबत दोन विधानसभाही जिंकल्या

चंद्राबाबूंचा सुपडासाफ, भाजपने लोकसभेसोबत दोन विधानसभाही जिंकल्या

हैदराबाद : देशात पुन्हा भाजपचे सरकार येणार, हे आता सिद्ध झालं आहे. देशातील सर्वाधिक जागांवर भाजपा आघाडीवर दिसत आहे. तसेच लोकसभेसोबत आज चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचेही निकाल स्पष्ट झाले आहेत. या निकालात आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना मोठा झटका बसला आहे. आंध्रप्रदेश विधानसभेचा निवडणूक निकाल आज लागला आहे. यात जनतेने टीडीपीला स्पष्टपणे नाकारलेलं दिसत आहे, तर वायएसआर काँग्रेस पक्षाला बहुमत मिळालं आहे. याशिवाय टीडीपीला लोकसभा निकालातही निराशाजनक कौल मिळाला आहे. इतकंच नव्हे तर, भाजपने राज्यात लोकसभेच्या दोन जागांवर विजय मिळवला आहे.

आंध्रप्रदेशसह ओडीशा, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम राज्यातही आज विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला.

आंध्रप्रदेशात टीडीपीला झटका

आतापर्यंतच्या आकड्यानुसार 175 विधानसभा जागा असलेल्या राज्यात टीडीपीच्या हातातून सत्ता जात असल्याचे दिसत आहे. टीडीपीला केवळ 28 जागांवर आतापर्यंत आघाडी मिळालेली आहे, तर YSR काँग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले दिसत आहे. स्पष्ट बहुमतासाठी 88 जागांची गरज होती. त्यानुसार YSR काँग्रेसने 145 जागांवर आघाडी मिळवलेली आहे.

चंद्राबाबू नायडूसांठी हा धक्कदायक पराभव मानला जात आहे. कारण विधानसेभेसोबत लोकसभा निवडणुकीच्या निकालातही पक्षाची कामगिरी निराशाजनक दिसत आहे. यामध्ये टीडीपी फक्त एका जागेवर आघाडीवर दिसत आहे. टीडीपी प्रमुख आणि मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू लवकरच राज्यपालांकडे आपला राजीनामा देणार आहे.

ओडीशामध्ये बीजेडीचे बहुमत

नुकतेच फनी वादळामध्ये ओडीशातील जनतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यावेळी ओडीशाचे मुख्यमंत्री आणि बीजेडीचे प्रमुख नवीन पटनायक यांनी जनतेला उत्तम प्रकारे मदत केली होती. त्यामुळे यंदाही जनतेने सत्तेचा कौल पटनायक यांच्या पराड्यात दिला आहे. तसेच लोकसभा निवडणुकीतही 14 जागांवर आघाडी मिळवली आहे.

अरुणाचलमध्ये भाजप बहुमताच्या दिशेने

अरुणाचल विधानसभा निवडणुकीत आतापर्यंत भाजप मोठ्या प्रमाणात आघाडीवर आहे. 60 जागा असलेल्या राज्यात सत्ता मिळवण्यासाठी 31 जागांची गरज आहे. यामध्ये भाजप 42, काँग्रेस 9 आणि एनपीपी 4 जागांवर आघाडीवर आहे. अरुणाचलमध्ये काँग्रेस आणि नॅशनल पीपल्स पार्टीला पूर्णपणे जनतेने नाकारले आहे.

सिक्कीमध्ये एसडीएफ आघाडीवर

सिक्कीममध्ये विधानसभा निवडणुक निकाल लागला आहे. येथे एकूण 32 जागा आहेत. येथे 18 जागा डेमोक्रेटिक फ्रंट (एसडीएफ), तर सिक्किम क्रांतिकारी मोर्चाने 14 जागांवर आघाडी मिळवली आहे. जर काही यामध्ये बदल झाले नाहीत, तर मुख्यमंत्री पवन कुमार बनू शकतात.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI