चांगल्या कामाला आमच्या नेहमीच शुभेच्छा, पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्यावर उद्धव ठाकरेंचा टोला

चांगल्या कामाला आम्ही नेहमीच शुभेच्छाच देतो, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. (CM Uddhav Thackeray on PM Narendra Modi Pune Visit)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 9:45 AM, 27 Nov 2020

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या  28 नोव्हेंबरला पुणे दौऱ्यावर येत आहे. यावेळी मोदी सिरम इन्स्टिट्यूटला भेट देऊन कोरोना लसीच्या प्रगतीचा आढावा घेणार आहेत. यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सवाल विचारला. पंतप्रधान मोदी सिरम इन्स्टिटय़ूटला भेट देत आहेत. चांगलं आहे. चांगल्या कामाला आम्ही नेहमीच शुभेच्छाच देतो, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. (CM Uddhav Thackeray on PM Narendra Modi Pune Visit)

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 28 नोव्हेंबरला पुण्यात येणार आहेत. त्याच दिवशी ते सिरम इन्स्टिट्यूला भेट देणार आहेत. दुपारी 1 ते 2 या दरम्यान मोदी सिरम इन्स्टिट्यूटमध्ये लसीच्या निर्मितीबाबत माहिती घेतील. त्यानंतर 4 डिसेंबरला 100 देशांचे राजदूत सिरम इन्स्टिट्यूट आणि हिंजवडीतील जिनेव्हा बायोटेक कंपनीला भेट देणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी त्यांनी यावर उत्तर दिलं.

महाविकासआघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली. नुकतंच ही मुलाखत प्रसारित करण्यात आली.

“कोरोना लसीबाबत पंतप्रधानांनी परवाच व्हिडीओ काॅन्फरन्सिंग घेतली. अजूनही कोणतंही वॅक्सिन हातात आलेलं नाही. कधी येईल माहिती नाही. पंतप्रधान मोदी यांचा पुण्यात दौर आहे. पण त्यांनीच काल सांगितलंय की, अजूनही लस हाती आलेली नाही. या दौऱ्यात मला माहीत नाही, काय नक्की होणार आहे,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी सिरम इन्स्टिटय़ूटला भेट देत आहेत. चांगलं आहे. चांगल्या कामाला आम्ही नेहमीच शुभेच्छाच देतो. त्यांनी चांगलं काम करावंं,” असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.

“हात धुऊन मागे लागायचे की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न”

कोरोनाबाबत देशासाठी एक धोरण ठरवा असे मी त्यांना सांगितलं आहे. या विषयावर परवाही चर्चा झाली. पण लस कधी येणार माहीत नाही. आपल्या बारा कोटी जनतेला टप्प्याटप्प्याने द्यायचं. मग प्राधान्याने कोणाला द्यायची. बहुतेक ज्या कंपन्या आहेत. त्यांचे बुस्टर डोस आहेत. म्हणजे प्रत्येकाला दोनदा तरी ही लस द्यावी लागणार आहे.

म्हणजेच त्याला खूप वेळ जाणार आहे आणि ती लस दिल्यानंतर प्रतिबंधात्मक शक्ती किती दिवसांनंतर येणार आणि किती काळ टिकणार? याच्यावर उत्तर नाही. म्हणजेच काय की मास्क लावा, अंतर ठेवा आणि हात धुवा. हाच तूर्त उपाय आहे. हात धुऊन मागे लागायचे की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण या तीन गोष्टी या व्हायरसपासून आपल्याला दूर ठेवतील हे आता जागतिक सत्य आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.  (CM Uddhav Thackeray on PM Narendra Modi Pune Visit)

संबंधित बातम्या : 

मी नामर्द नाही, ‘ईडी’ वगैरेचा गैरवापर करून दबाव आणाल तर याद राखा, उद्धव ठाकरेंचा रोखठोक इशारा

पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 नोव्हेंबरला पुणे दौऱ्यावर, कोरोना लस निर्मिती करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार