मोठी बातमी! काँग्रेसला जबर धक्का, बडा नेता शिंदे गटात जाणार?
काँग्रेसच्या या बड्या नेत्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेते तथा मंत्री भरतशेठ गोगावले यांची भेट घेतली आहे.

Bhagirath Bhalke : गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस पक्षातील नेते भगिरथ भालके हे नाराज असल्याचं बोललं जातंय. असं असतानाच आता भगिरथ भालके यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते तथा मंत्री भरत गोगावले यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे आता राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. भगिरथ भालके हे भविष्यात काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
सुशिलकुमार शिंदे यांना मोठा धक्का?
भगिरथ भालके यांनी आपले कार्यकर्ते तसेच माजी नगरसेवकांच्या शिष्टमंडळासह भरत गोगावले यांची भेट घेतली आहे. काही दिवसांपासून भालके हे काँग्रेसमध्ये नाराज असल्याचं म्हटलं जात आहे. भालके हे शिवसेनेत गेले तर हा सोलापूरचे नेते सुशिलकुमार शिंदे यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.
कोण आहेत भगिरथ भालके?
भगिरथ भालके हे सोलापूर, पंढरपूर या भागातील राजकीय क्षेत्रातील मोठे नाव आहे. त्यांचे वडील दिवंगत नेते भारत भालके हे आमदार राहिलेले आहेत. भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक झाली होती. भगिरत भालके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर ही पोटनिवडणूक लढवली होती. मात्र या निवडणुकीत भालके यांचा 3,503 मतांनी पराभव झाला होता. तर या निवडणुकीत समाधान आवताडे यांनी बाजी मारली होती. त्यांनी भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती.
अनेक नेत्यांनी केला पक्षबदल
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. अनेक नेते आल्या साईसाठी पक्षबदल करत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लक्षात घेता अनेकांनी आतापर्यंत पक्षबदल केला आहे. त्यानंतर आता भगिरथ भालके यांनी भरत गोगावले यांची भेट घेतल्यानंतर तेही शिवसेना पक्षात जातात की काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अजूनतरी भगिरथ भालके यांनी या भेटीवर कोणतेही थेट भाष्य केले नाही. पण आगामी काळात नेमकं काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागेल आहे.
