मुख्यमंत्री फडणवीसांचं चॅलेंज स्वीकारलं, नाना पटोलेंची घोषणा

काँग्रेसचे उपाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं  (Devendra Fadnavis) कामाचा हिशोब मांडण्याचेआव्हान स्वीकारलं आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी महाजनादेश यात्रेच्या पहिल्या सभेत अमरावती येथे विरोधकांना त्यांनी काय काम केलं आणि सरकारने काय काम केलं हे सांगण्याचं आव्हान दिलं होतं.

मुख्यमंत्री फडणवीसांचं चॅलेंज स्वीकारलं, नाना पटोलेंची घोषणा


मुंबई : काँग्रेसचे उपाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं  (Devendra Fadnavis) कामाचा हिशोब मांडण्याचेआव्हान स्वीकारलं आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी महाजनादेश यात्रेच्या पहिल्या सभेत अमरावती येथे विरोधकांना त्यांनी काय काम केलं आणि सरकारने काय काम केलं हे सांगण्याचं आव्हान दिलं होतं. तसंच आपण कमी पडलो, तर महाजनादेश (Mahajanadesh) यात्रेला जाणार नाही, असंही नमूद केलं होतं.

मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेल्या आव्हानावर पटोले म्हणाले, “मुख्यमंत्री यांचं वादविवादाचं आव्हान मी घेतो. मी मुख्यमंत्री यांच्यासमोर वादविवाद करायला तयार आहे. ते  महाजनादेश यात्रेसाठी जेथे जेथे मेळावे घेतील, तेथे तेथे आम्ही पर्दाफाश मेळावे घेऊ.”

मुख्यमंत्री तुकडोजी महाराजांच्या पुण्यभूमीवर खोटं बोलले

मुख्यमंत्री फडणवीस संत तुकडोजी महाराजांच्या पुण्यभूमीवर खोटं बोलल्याचाही आरोप केला. ते म्हणाले, “मुख्यमंत्री फडणवीसांनी या राज्याचा दुप्पट विकास केल्याचा दावा केला. मात्र, असं काहीही नसून खरंतर राज्यावर कर्जाच्या बोजात दुप्पट वाढ झाली आहे. मुख्यमंत्री संत तुकडोजी महाराजांच्या पुण्यभूमी मोझरी येथे येऊन खोटं बोलले. त्यामुळे काँग्रेसच्यावतीने ‘फडणवीस दामदुप्पट पर्दाफाश महामेळावे’ घेऊ. तसेच मुख्यमंत्र्यांचा खोटारडेपणा पुराव्यानिशी जनतेसमोर मांडू.”

‘मुख्यमंत्री फडणवीस गुजरातचे दलाल’

दमणगंगा पिंजाळ प्रकल्पाच्या पाण्याच्या मुद्द्यावर नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली. तसेच मुख्यमंत्री फडणवीस गुजरातचे दलाल असल्याचा घणाघाती आरोप केला. दमणगंगा पिंजाळ प्रकल्पाच्या पाण्यावर गुजरातचा 1 लिटरचाही हक्क नसताना मुख्यमंत्र्यांनी हा प्रकल्प आंतरराज्यीय म्हणून का घोषित केला असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.

मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले होते?

“महाराष्ट्रातील गावागावात जाऊन सेवा करण्यासाठी या यात्रेची सुरुवात आम्ही करत आहोत. देशात मोदींच्या नेतृत्वात गाव, गरिब आणि किसान ही त्रिसूत्री घेऊन काम केले. विरोधकांना आव्हान आहे की तुम्ही काय केलं आणि आम्ही काय केलं ते सांगा. आम्ही कमी पडलो असेल, तर महाजनादेश यात्रेला निघणार नाही”, असं मुख्यमंत्री म्हणाले होते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI