MPSCचं आंदोलन गाजवणाऱ्या विवेकानंद पाटीलला महाराष्ट्रातील हा नेता देणार घर बांधून
शेती करणारे आई वडील, छोटसं पत्र्याचे घर. मातीने सारवलेल्या भींती, शेणाची जमीन आणि त्यात पुस्तके असे अतिशय छोटे विवेकानंदचे घर आहे. ते पाहून एका नेता भावूक झाला आहे. त्याने विवेकानंदला घर बांधून देणार असल्याचे म्हटले आहे.

सध्या संपूर्ण राज्यात MPSCचं आंदोलन गाजवणाऱ्या विवेकानंद पाटीलची चर्चा रंगली आहे. त्याने आंदोलनात आमदार फुटले, खासदार फुटले, MPSC चे पेपर फुटले आता बालवाडीचे पेपर फुटायची वेळ येऊ देऊ नका, अशा खुमासदार भाषणाने ज्वलंत प्रश्न चव्हाट्यावर आणणारा विवेकानंद पाटील असे म्हणत अनेक ज्वलंत प्रश्न सर्वांसमोर मांडले. तसेच त्याची अभ्यासपूर्ण मांडणी रांगडी भाषा आणि परखड मताची राज्यभरात चर्चा झाली. पण अतिशय गरीब कुटुंबातून आलेल्या विवेकानंद याचे घर पाहून एका बड्या नेत्याच्या डोळ्यात पाणी आले.
आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांना आंदोलनात खेळवून ठेवणारा विवेकानंद पाटील हा मूळचा राधानगरी तालुक्यातील माजगाव या छोट्याशा गावातला तरुण आहे. शेती करणारे आई वडील, छोटसं पत्र्याचे घर. मातीने सारवलेल्या भींती, शेणाची जमीन आणि त्यात पुस्तके असे अतिशय छोटे विवेकानंदचे घर आहे. तसेच वक्तृत्व स्पर्धेतून मिळालेल्या बक्षिसाची मांडणी असं विवेकानंदच्या घरातील दृश आहे. हे दृश्य पाहून काँग्रेस नेते विश्वजीत कदम हे भावूक झाले आहेत. त्यांनी थेट विवेकानंदला घर बांधून देणार असल्याचे म्हटले आहे.
काय म्हणाले विश्वजीत कदम?
विश्वजीत कदम म्हणाले की, विवेकानंद पाटीलला मी घर बांधून देणारच. त्याच्यासाठी नाही निदान त्याच्या आई वडिलांसाठी. तो प्रसिद्ध झाला म्हणून हे मी करत नाही. त्याचं घर पाहून मी भावनिक झालो. माझे वडील पण अशाच घरात राहायचे. वडील सांगायचे आठवड्यातून एक दिवस घरी अंड खायला भेटायचं. मी भावनिकतेतून म्हटल की घर बांधून देतो.
पुढे मुख्यमंत्र्यांना विनंती करत विश्वजीत कदम म्हणाले की, एमपीएससी विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडवला जावा अशी आमची मागणी आहे. विद्यार्थ्यांची दखल घ्यायला सरकार तयार नाही. मुख्यमंत्री यांना विनंती आहे की त्यांनी हा प्रश्न सोडवावा.
कोण आहे विवेकानंद पाटील?
आपल्या खास कोल्हापूरी लकबीत, रांगड्या शैलीत अस्सल देशी स्वॅगने अवघ्या काही काळातच विवेकानंद पाटील हा एमपीएससी आंदोलनातील विद्यार्थ्यांच्या गळ्यातील ताईत झाला आहे. त्याचा दमदार भाषणाने राज्याचे लक्ष वेधले आहे. कोणताही मुलाहिजा न बाळगता त्याने खणखणीत भाषणं ठोकली आहेत. सोशल मीडियावर त्याचा जणू स्वॅग सुरू आहे.24 वर्षांचा विवेकानंद पाटील पुण्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणारा विद्यार्थी आहे.
