Breaking : ‘राज्यात काँग्रेसमध्ये कुठलाच समन्वय नाही’, काँग्रेस आमदारांची दिल्ली दरबारी खंत! थेट सोनियांकडे तक्रार

| Updated on: Apr 05, 2022 | 9:16 PM

काँग्रेसमधील आमदारांनी आपली नाराजी थेट दिल्ली दरबारी व्यक्त केलीय. काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी आणि महाराष्ट्रातील 35 आमदारांची राजधानी दिल्लीत जवळपास 35 मिनिटे बैठक झाली. या बैठकीत काँग्रेस आमदारांनी राज्यातील मंत्र्यांची तक्रार थेट सोनिया गांधींकडे केलीय.

Breaking : राज्यात काँग्रेसमध्ये कुठलाच समन्वय नाही, काँग्रेस आमदारांची दिल्ली दरबारी खंत! थेट सोनियांकडे तक्रार
सोनिया गांधी, प्रभारी अध्यक्षा, काँग्रेस
Image Credit source: TV9
Follow us on

नवी दिल्ली : महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) सर्वकाही आलबेल असल्याचा आणि सरकार पाच वर्षे टिकणार असा दावा सत्ताधारी नेते करत आहेत. असं असलं तरी महाविकास आघाडीतील घटकपक्षांमधील वाद आणि शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत धुसफुस सातत्याने समोर येत आहे. आता तर काँग्रेसमधील आमदारांनी (Congress MLA) आपली नाराजी थेट दिल्ली दरबारी व्यक्त केलीय. काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी आणि महाराष्ट्रातील 35 आमदारांची राजधानी दिल्लीत जवळपास 35 मिनिटे बैठक झाली. या बैठकीत काँग्रेस आमदारांनी राज्यातील मंत्र्यांची तक्रार थेट सोनिया गांधींकडे (Sonia Gandhi) केलीय. राज्यात काँग्रेस पक्षात कुठलाही समन्वय नाही. राष्ट्रवादीत अजित पवार, शिवसेनेत एकनाथ शिंदे आहेत. पण काँग्रेसमध्ये एकही मंत्री पुढाकार घेत नाही. काँग्रेस आमदारांना निधी मिळत नाही. मंत्री फक्त आपल्या मतदारसंघासाठी निधी घेतात, अशी तक्रारच काँग्रेस आमदारांनी सोनियांकडे केल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे काँग्रेसमधील आमदारांची नाराजी आता थेट दिल्ली दरबारी पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे.

संग्राम थोपटेंच्या लेटरहेडवरील केली होती भेटीची मागणी

महाराष्ट्र काँग्रेसच्या 25 आमदारांनी भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या लेटरहेडवर प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे भेटीची मागणी केली होती. काँग्रेस आमदारांच्या या पत्रानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली होती. काँग्रेस आमदार नेमक्या कोणत्या कारणासाठी सोनिया गांधी यांना भेटणार आहेत यावरुन राज्याच्या राजकारणात तर्क वितर्क सुरु झाले होते. विरोधी पक्षांनी काँग्रेस सोबत शिवसेनेचे आमदार नाराज असल्याच्या चर्चा सुरु केल्या. मात्र, संग्राम थोपटे यांनी सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी कोणत्या कारणामुळं पत्र लिहिलं यांचं कारण सांगितलं होतं. संसदेत प्रशिक्षण कार्यक्रम असल्यानं आमदार दिल्लीला जाणार असल्याचं थोपटे म्हणाले होते.

सोनिया गांधी काय अॅक्शन घेणार?

महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून त्यांच्यात वाद सुरू आहेत. हे सरकार अधिककाळ टिकणार नाही अशी टीका वारंवार विरोधकांकडून होत असते. तसंच त्यांच्यात ताळमेळ नसल्याने महाविकास आघाडी सरकार कधीही कोसळू शकते असं भाजपाच्या अनेक नेत्यांनी म्हटलं होतं. पण कॉंग्रेस आमदारांच्या जाहीर नाराजीनंतर हा मुद्दा पुन्हा एकदा डोकं वर काढतोय. तक्रार केल्यानंतर कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यावर काय निर्णय घेतात हे पाहावं लागेल.

इतर बातम्या : 

Video : नगराध्यक्षाची अधिकाऱ्याला मारहाण! संपूर्ण प्रकार CCTV त कैद; मारहाणीचं कारण नेमकं काय?

‘महागाईमुक्त भारत’ आंदोलनात 7 तारखेला मुंबईत काँग्रेसचा एल्गार, नाना पटोलेंची घोषणा