देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला ‘पुन्हा आले’!

राज्यात राष्ट्रपती राजवट लागल्यानंतर राज्याची सर्व सूत्रं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हातात गेली आहेत

देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला 'पुन्हा आले'!

मुंबई : महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा तिढा कायम असतानाच भाजपचे विधीमंडळ पक्षनेते देवेंद्र फडणवीस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीसाठी राजभवनात (Devendra Fadnavis meets Governor) आले होते. फडणवीसांनी राज्यपालांची भेट घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र शेतकऱ्यांसाठी तातडीने निधी वितरित करण्याच्या मागणीसाठी ही भेट झाल्याची माहिती आहे.

‘अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. त्यांना तातडीने मदत करण्यासाठी निधी तात्काळ वितरित करण्यात यावा’, अशी मागणी फडणवीसांनी केली. यावर लगेच कारवाई करण्याचं राज्यपालांनी मान्य केलं.

मुख्यमंत्री सहायता निधीतून गरीब रुग्णांना दिलासा दिला जातो. या निधीचे संचालन राज्यपाल कार्यालयातर्फे करण्यात यावे. पण एकही गरजू रुग्ण मदतीपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे, अशी विनंती फडणवीसांनी केली. यावर राज्यपालांनी तात्काळ कार्यवाहीचे आश्वासन दिले.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागल्यानंतर राज्याची सर्व सूत्रं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हातात गेली आहेत. 13 व्या विधानसभेचा कालावधी संपताना तांत्रिक बाबींच्या पूर्ततेसाठी देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनावर जाऊन मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला होता.

5 वर्ष 8 दिवस मुख्यमंत्रिपद भूषवून महाराष्ट्रातील जनतेची सेवा केल्यानंतर देवेंद्र फडणवीस पदावरुन पायउतार झाले होते. त्यावेळी सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी भाजपला निमंत्रण देण्यापूर्वी राज्यपालांनी देवेंद्र फडणवीसांनाच काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहण्याची विनंती केली होती.

सत्तासंघर्ष कसा चालला?

राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी सर्वात आधी मोठा पक्ष असलेल्या भाजपला सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं होतं. मात्र भाजपने शिवसेनेची इच्छा नसल्याचं रविवारी (10 नोव्हेंबर 2019) सत्तास्थापनेचा दावा करण्यास असमर्थता दर्शवली. त्यानंतर राज्यपालांनी दुसऱ्या क्रमाकांचा पक्ष शिवसेनेला आवताण दिलं होतं.

शिवसेनेने सोमवारी रात्री (11 नोव्हेंबर 2019) राज्यपालांची भेट घेऊन, सत्तास्थापनेचा दावा केला. शिवसेनेला पाठिंब्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्याची गरज लागली. मात्र दिल्लीमध्ये काँग्रेस हायकमांडच्या बैठकांचं सत्र सुरु होतं. त्यातच झालेल्या दिरंगाईमुळे शिवसेनेला केवळ सत्तास्थापनेचा दावा करता आला, मात्र बहुमतासाठी लागणारी दोन्ही पक्षांची पाठिंबा पत्रं राज्यपालांकडे सादर करता आली नाहीत. आवश्यक संख्याबळ दाखवण्यासाठी शिवसेनेने राज्यपालांकडे वेळ मागितला. पण राज्यपालांनी त्याला नकार दिला.

राज्यपालांनी लगेचच राष्ट्रवादी काँग्रेसला निमंत्रण दिलं. राष्ट्रवादी काँग्रेसला मंगळवारी रात्री (12 नोव्हेंबर 2019) 8.30 वाजेपर्यंतची मुदत दिली होती. मात्र त्याआधी राष्ट्रवादीनेही मुदतवाढ मागितली. परंतु राज्यपालांनी राष्ट्रवादीलाही वेळ वाढवून देण्यास नकार देत राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली. त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या स्वाक्षरीने मंगळवार 12 नोव्हेंबर 2019 रोजी संध्याकाळी 5.30 वाजता महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली.

Devendra Fadnavis meets Governor

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI