देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, सर्वच मंत्र्यांना तंबी, म्हणाले आता शेवटची संधी!
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही मंत्री चांगलेच वादात सापडले आहेत. हीच बाब लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वच मंत्र्यांना तंबी दिली आहे.

Devendra Fadnavis : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही मंत्री चांगलेच वादात सापडले आहेत. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचा बेडरुममधला एक व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओत त्यांच्या खोलीत पैशांनी भरलेली एक बॅग होती. त्यानंतर पावसाळी अधिवेशनादरम्यान कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे ऑनलाईन रमी गेम खेळताना दिसले. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर कोकाटे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली जात आहे. या सर्व बाबी लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वच मंत्र्यांना तंबी दिली आहे. यापुढे चुका खपवून घेतल्या जाणार नाहीत, असं फडणवीसांनी मंत्र्यांना स्पष्टपणे सांगितलं आहे.
फडणवीसांनी घेतला मंत्र्यांचा क्लास
राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत वेगवेगल्या खात्यांसंबंधी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. कृषी, ग्रामविकास विभाग, विधी व न्याय विभागाअंतर्गत वेगवेगळ्या तरतुदी करण्यात आल्या. दरम्यान, याच बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी सर्वच मंत्र्यांचा क्लास घेतला आहे.
वादग्रस्त विधाने खपवून घेणार नाही
मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 20 मिनिटे सर्वच मंत्र्यांना काही सूचना केल्या. वादग्रस्त विधाने, कृती अजिबात खपवून घेतली जाणार नाही. असेच प्रकार होत राहिले तर सरकारची प्रचंड बदनामी होते. ही अखेरची संधी, काय कारवाई करायची ती करूच, असा इशाराच फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना दिला. आता एकही प्रकार खपवून घेणार नाही, असा थेट इशाराही फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना दिला. तसेच त्यांनी सर्व मंत्र्यांवर प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.
नेमकं काय घडतंय?
गेल्या काही दिवसांपासून महायुती सरकारचे मंत्री, आमदार वादात सापडले आहेत. यापैकी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे प्रकरण सर्वाधिक गाजले. विधिमंडळात कायदा आणि सुव्यवस्था, राज्याचा विकास याबाबत महत्त्वाचे कायदे केले जातात. याच विधिमंडळाच्या सभागृहात माणिकराव कोकाटे ऑनलाईन रमीचा जुगार खेळताना दिसले. त्यांचे गेम खेळत असतानाचे काही व्हिडीओ समोर आले. त्यानंतर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. याआधाही कोकाटे यांनी काही वादग्रस्त विधानं केली होती. रमी गेम खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांनी राज्य सरकार भिकारी आहे, असेही एक विधान केले. संजय शिरसाट यांच्या बेडरुममध्ये पैशांनी भरलेली कथित बॅग असल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सरकार बॅकफुटवर गेले. या सर्वच घडामोडींमुळे फडणवीसांना आपल्या मंत्र्यांना तंबी दिली आहे.
