मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांच्यावर अंमलबजावणी संचलनालय (Enforcement Directorate) अर्थात ईडीनं मोठा दणका दिलाय. पाटणकर यांच्या ठाण्यातील 11 सदनिका ईडीकडून जप्त करण्यात आल्या आहेत. त्याची एकूण किंमत 6 कोटी 45 लाख इतकी असल्याची माहितीही ईडीकडून देण्यात आलीय. ईडीने पुष्पक ग्रुपच्या कंपन्यांपैकी एक असलेल्या मेसर्स पुष्पक बुलियनशी संबंधित 6 कोटी 45 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आलीय. यात साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेडच्या ठाण्यातील नीलांबरी प्रकल्पातील 11 सदनिकांचा समावेश आहे. ईडीच्या कारवाईनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर हा सध्या देशासमोरील सर्वात मोठा प्रश्न बनल्याची टीका पवार यांनी केलीय.