…आणि मुक्ताईनगरच्या कार्यालयावर 40 वर्षांपासून असलेली भाजपची ओळख एका रात्रीत नाहिशी

आता लवकरच मुक्ताईनगरच्या या कार्यालयावर राष्ट्रवादी जनसंपर्क कार्यालय असा फलक लागेल. | Eknath Khadse

...आणि मुक्ताईनगरच्या कार्यालयावर 40 वर्षांपासून असलेली भाजपची ओळख एका रात्रीत नाहिशी

जळगाव: तब्बल चार दशकांपासून भाजपमध्ये असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी बुधवारी पक्षाचा राजीनामा दिला. यानंतर एकनाथ खडसे यांचा बालेकिल्ला असणाऱ्या मुक्ताईनगरात अगदी वेगळे वातावरण पाहायला मिळत आहे. खडसे यांनी अधिकृतरित्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असे जाहीर केल्यानंतर मुक्ताईनगर येथील त्यांच्या संपर्क कार्यालयावर लावलेले भाजपचे फलक रातोरात हटवण्यात आले. गेल्या 40 वर्षांपासून खडसे याच कार्यालयातून सामान्य जनतेशी संवाद साधायचे. त्यामुळे मुक्ताईनगरचे हे कार्यालय आणि भाजप हे जणू अविभाज्य समीकरण झाले होते. (Eknath Khadse office in Muktainagar)

मात्र, खडसे यांनी भाजपला रामराम केल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी संपर्क कार्यालयावरील कमळाचे चिन्ह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असलेले फलक खाली उतरवले. आता लवकरच मुक्ताईनगरच्या या कार्यालयावर राष्ट्रवादी जनसंपर्क कार्यालय असा फलक लागेल.
एकनाथ खडसे शुक्रवारी दुपारी दोन वाजता आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. कालपासून नाथाभाऊंच्या बंगल्यावर समर्थक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची प्रचंड रेलचेल सुरु आहे. लवकरच एकनाथ खडसे यांचे समर्थक मुंबईत दाखल होतील. गेल्या दोन दिवसांपासूनच मुक्ताईनगरात मोठा धामधुम आहे. “नाथाभाऊ तुम्ही बांधाल तेच तोरण, तुम्ही ठरवाल तेच धोरण” असे बॅनर खडसेंच्या समर्थकांनी झळकावले होते. एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशासाठी कार्यकर्त्यांनी मुंबईला जाण्यासाठी आपल्या गाड्यांवरती स्टिकर्स लावले होते.

एकनाथ खडसे यांचं महाविकास आघाडीत स्वागतच : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

उस्मानाबाद: एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकल्यानंतर शुक्रवारी त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार असल्याची अधिकृत घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. त्यावर एकनाथ खडसे महाविकास आघाडीत येत असतील तर त्यांचं स्वागतच आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

‘एकनाथ खडसेंचा प्रवेश अंधारात होणार नाही, उजेडात होईल’
गेले तीन दशकं भाजपचे नेतृत्व करणारे, उत्तर महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडेंसह काम करणाऱ्या एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडल्याची घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली होती. एकनाथ खडसेंचा प्रवेश अंधारात होणार नाही, उजेडात होईल, खडसे हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या अनुभवाचा राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चितच फायदा होईल, असेही जयंत पाटील यांनी म्हटले.

संबंधित बातम्या:

Special Report | एकनाथ खडसे राष्ट्रवादीत, उत्तर महाराष्ट्रातील राजकारणावर काय परिणाम?

एकनाथ खडसेंना पश्चाताप होईल, खडसेंच्या राजीनाम्यानंतर भाजपची पहिली प्रतिक्रिया

(Eknath Khadse office in Muktainagar)

Published On - 8:49 am, Thu, 22 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI