शरद पवारांच्या नेतृत्वाखाली बैठक, कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची हाणामारी

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीच्या वेळी परभणीतील कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यामुळे राष्ट्रवादी भवनाच्या मुख्यालयाबाहेर तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

शरद पवारांच्या नेतृत्वाखाली बैठक, कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची हाणामारी
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Jun 23, 2019 | 2:17 PM

मुंबई : लोकसभेत दारुण पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभेच्या पार्श्वभुमीवर सतत बैठका घेतल्या जात आहेत. आज (23 जून) विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीच्या परभणीतील कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यामुळे राष्ट्रवादी भवनाच्या मुख्यालयाबाहेर तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

मराठवाड्यातील राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव कुणामुळे झाला, यावर चर्चा करत असताना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाला. त्यानंतर परभणीतील गंगाखेडच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाचीही झाली आणि या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. यामुळे काहीकाळासाठी राष्ट्रवादी भवनाबाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शरद पवारांनी आयोजित केलेल्या बैठकीत राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळांसह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.

राष्ट्रवादीला मराठवाड्यात लोकसभा निवडणुकीत एकही जागा जिंकता आलेली नाही. उस्मानाबाद, परभणी, बीड या लोकसभा मतदारसंघांमध्ये पक्षाची ताकद असूनही पक्षाला पराभव स्वीकारावा लागला. त्यातच बीडचे राष्ट्रवादीचे नेते जयदत्त क्षीरसागर यांनी पक्षाला रामराम करत शिवसेनेचे शिवबंधन हातात बांधल्याने राष्ट्रवादीला मोठा झटका बसला. त्यामुळे किमान विधानसभा निवडणुकीत तरी पक्षाची मोट बांधून विजयी होण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरु आहे. मात्र, कार्यकर्ते आणि पदाधिकारी अजूनही मागील पराभवातच अडकून बसलेले असल्याचे आजच्या हाणामारीतून दिसते आहे.

काँग्रेसच्या लोकसभेतील कामगिरीशी तुलना करता राष्ट्रवादीने तशी चांगली कामगिरी केली आहे. मात्र, पवार कुटुंबातील नव्या पिढीला विजयी करण्यात पक्षाच्या कार्यकर्त्यांना यश आले नाही. याचेही शल्य अनेकांच्या मनात असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादीला लोकसभेच्या अनेक जागांवर पराभव पाहावा लागला असला, तरी अनेक ठिकाणी त्यांना चांगली मते मिळाली. मराठवाड्यातील उस्मानाबाद, बीड, परभणी येथे राष्ट्रवादीला मिळालेली मतसंख्या मोठी आहे. त्यामुळे ठिकाणी काँग्रेसकडून विधानसभेच्या जागा मिळवण्याचे प्रयत्न राष्ट्रवादी करत आहे. मात्र, कोणत्या जागा कुणाला मिळणार? हे अद्यापही गुलदस्त्यातच आहे. लोकसभेच्या पराभवानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघे वंचित बहुजन आघाडीसोबत युतीकरण्यासाठी देखील अनुकुल असल्याचे दिसते आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत येणाऱ्या काळात हाणामाऱ्या सुरुच राहणार की सामजस्याने मित्र पक्षांशी युती करत एकत्र निवडणुका लढवल्या जाणार हे लवकरच स्पष्ट होईल.


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें