मतदानाला गालबोट, अहमदनगरसह बीड, नागपूर, सोलापूरमध्ये जोरदार हाणामारी

राज्यभर आज (21 ऑक्टोबर) विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election) मतदान होत आहे. मात्र, काही ठिकाणी मतदानाला गालबोट लागले आहे.

मतदानाला गालबोट, अहमदनगरसह बीड, नागपूर, सोलापूरमध्ये जोरदार हाणामारी

मुंबई : राज्यभर आज (21 ऑक्टोबर) विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election) मतदान होत आहे. मात्र, काही ठिकाणी मतदानाला गालबोट लागले आहे. अहमदनगरसह बीड, नागपूर आणि सोलापूरमध्ये वेगवेगळ्या राजकीय गटांमध्ये हाणामारीच्या (Fighting during voting for Assembly Election) घटना घडल्या आहेत. त्यामुळे काहीकाळ पोलीस यंत्रणांची चांगलीच धावपळ उडाली.

अहमदनगरमधील जामखेड येथे बांधखडक गावात दोन गटात तुफान राडा झाला. यावेळी भाजप-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपआपसात भिडले. मतदानाला जात असताना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटात शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर या वादाचे रुपांतर थेट हाणामारीत झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्यांवर चाकू हल्ला केल्याचाही आरोप झाला आहे. या हल्ल्यात भाजपचे दोन कार्यकर्ते जखमी झाले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या वाहनावर दगडफेक केल्याचाही आरोप आहे. यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या वाहनाची तोडफोड झाली. याप्रकरणी पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतले आहे.

पंढरपूरमध्ये करमाळ्यातही दोन गटात मतदान केंद्रातच मारहाणीची घटना घडली. त्यानंतर वातावरण चांगलेच तापले होते. या घटनेने करमाळ्यातील मतदानाला हिंसक वळण लागले. यावर बोलताना संजय शिंदे यांनी हा प्रकार आपल्याला बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याचं घटलं आहे. अपक्ष उमेदवार नारायण पाटील यांचीही मतदान केंद्रात पोलिसांशी बाचाबाची झाली.

बीडमध्ये देखील राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या दोन गटांमध्ये हाणामारी झाली. बीडमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप क्षीरसागर आणि शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांच्यातील संघर्ष शिगेला गेला आहे. राष्ट्रवादीच्या गटाकडून शिवसेनेवर बोगस मतदार आणल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावरुनच दोन गटात हाणामारी झाली. संबंधित बोगस मतदार जयदत्त क्षीरसागर यांच्या संस्थेतील कर्मचारी असल्याचा आरोप करण्यात येत आहे. पोलीस या आरोपांचा तपास करत आहेत.

नागपूरमध्ये भाजपचे उमेदवार राजीव पोतदार यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली. राजीव पोतदार सावनेर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आहेत. ते सिल्लेवाडा येथील मतदार केंद्रावरून परत येत असताना ही घटना घडली. या प्रकरणी पोतदारांनी खापरखेडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI