‘अधिवेशनात विरोधक फाडून खातील म्हणून कोरोनाचे भांडवल!’, निलेश राणेंचा गंभीर आरोप

अधिवेशन तोंडावर आल्यामुळे सत्ताधारी ते टाळण्यासाठी कोरोनाचं भांडवल करत आहेत. अधिवेशनात विरोधक फाडून खातील, अशी भीती सत्ताधाऱ्यांना वाटतेय, अशी टीका निलेश राणे यांनी केलीय.

  • महेश सावंत, टीव्ही 9 मराठी, सिंधुदुर्ग
  • Published On - 16:53 PM, 22 Feb 2021
'अधिवेशनात विरोधक फाडून खातील म्हणून कोरोनाचे भांडवल!', निलेश राणेंचा गंभीर आरोप
कॅबिनेट मिटिंगला येऊन बसतात. तरीही त्यांचा राजीनामा घेण्याचं धाडस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये नाही.

सिंधुदुर्ग : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केलाय. अधिवेशन तोंडावर आल्यामुळे सत्ताधारी ते टाळण्यासाठी कोरोनाचं भांडवल करत आहेत. अधिवेशनात विरोधक फाडून खातील, अशी भीती सत्ताधाऱ्यांना वाटतेय, अशी टीका निलेश राणे यांनी केलीय. त्याचबरोबर मुंबई महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरु असल्याचा आरोपही त्यांनी केलाय.(Nilesh Rane also criticized the Thackeray government)

महाविकास आघाडीचं कृषी विधेयकावर मुंबईत आंदोलन झालं त्याला गर्दी होती. 14 हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या, विजयी मिरवणुका निघाल्या, त्याला गर्दी होती. आता लोकल ट्रेलचं कारण सांगत आहेत. लोकल काय आताच सुरु झाल्या का?. मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार वाढला आहे. सरकारमधील अनेक मंत्री कुठल्या तरी भानगडीत अडकले आहेत. त्यावर विरोधक फाडून खातील. विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायला ना मुख्यमंत्री समर्थ आहेत ना उपमुख्यमंत्री, अशा शब्दात निलेश राणे यांनी ठाकरे सरकारवर तोंडसुख घेतलं.

आमदार नितेश राणेंचाही हल्लाबोल

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी महाविकासआघाडीतील नेत्यांना झालेला कोरोना खरा आहे की राजकीय असाच प्रश्न उपस्थित केलाय. “1 मार्चला अधिवेशन आहे आणि गेल्या 8 दिवसांमध्ये मंत्र्यांना कोरोना होण्याच्या बातम्या बाहेर येत आहेत. महाराष्ट्रभर फिरणाऱ्या मंत्र्यांना 8 दिवसांमध्ये झालेला हा कोरोना कोविड 19 चा आहे की राजकीय कोरोना आहे? कारण येणाऱ्या अधिवेशनात भारतीय जनता पक्षाच्या प्रश्नांना द्यायला यांच्याकडे उत्तर नाही. म्हणून राज्य सरकार कोरोनाचा आसरा घेत नाही ना हा प्रश्न माझ्या मनात आहे.”

“आमचे आरोग्यमंत्री राजेश टोपे गेल्या दीड वर्षात राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरले. त्यांना कधी आतापर्यंत कोरोना झाला नव्हता. तो बरोबर अधिवेशनाच्या आधी 8 दिवस झाला. छगन भुजबळांनाही नेमका आज सकाळी झाला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे कुटुंब संवाद यात्रेसाठी राज्यभर फिरत आहेत. त्यांना आतापर्यंत झाला नव्हता, तो बरोबर 8 दिवसांपूर्वी झाला. म्हणून हा एक वेगळ्या प्रकारचा कोरोना महाराष्ट्रात आला नाही ना असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला आहे,” असंही नितेश राणे यांनी नमूद केलं. मी WHO ला पत्र लिहून या कोरोनाबाबत संशोधन करण्यासाठी सांगणार आहे, असंही राणे म्हणाले.

संबंधित बातम्या :

महाराष्ट्रभर फिरणाऱ्या मंत्र्यांना झालेला कोरोना कोविड 19 चा आहे की राजकीय? : नितेश राणे

तू गरीब होने का नाटक मत कर ऐ दोस्त… उर्मिला मातोंडकरांचा कोणाला चिमटा?

Nilesh Rane also criticized the Thackeray government