औरंगाबाद लोकसभेला चंद्रकांत खैरेंनीच जलील यांना उभं केलं, हर्षवर्धन जाधवांचा दावा

शिवसेनेचे पराभूत उमेदवार चंद्रकांत खैरे यांनीच AIMIM चे उमेदवार जलील यांना निवडणुकीत उभं केल्याचा दावा हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे.

  • दत्ता कानवटे, टीव्ही 9 मराठी, औरंगाबाद
  • Published On - 19:51 PM, 24 Feb 2021
औरंगाबाद लोकसभेला चंद्रकांत खैरेंनीच जलील यांना उभं केलं, हर्षवर्धन जाधवांचा दावा

औरंगाबाद : कन्नड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी 2019च्या लोकसभा निवडणुकीबाबत एक दावा केलाय. शिवसेनेचे पराभूत उमेदवार चंद्रकांत खैरे यांनीच AIMIM चे उमेदवार जलील यांना निवडणुकीत उभं केल्याचा दावा हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे. मात्र, चंद्रकांत खैरे यांचा तो प्रयोग फसल्याचं जाधव यांनी म्हटलंय. हर्षवर्धन जाधव हे गौप्यस्फोट आणि वादग्रस्त व्यक्तव्यांनी ओळखले जातात. त्याप्रमाणेच त्यांनी अजून एक दावा केलाय.(Harshvardhan Jadhav’s secret blast about Chandrakant Khaire)

औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांनीच इम्तियाज जलील यांना उभं केलं होतं. निवडणुकीला धार्मिक रंग देऊन राजकीय पोळी भाजण्याचा चंद्रकांत खैरे यांचा प्रयत्न होता. मात्र, तो प्रयत्न त्यांच्या अंगलट आला, असा दावा हर्षवर्धन जाधव यांनी केलाय. त्याचबरोबर मागच्या काळातील आपले जेलमधील दिवस आपल्याला तावून सुलाखून काढणार होते, असंही हर्षवर्धन जाधव म्हणालेत.

हर्षवर्धन जाधव यांचं रावसाहेब दानवेंना आव्हान

“भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना पुढच्या निवडणुकीत घरी बसवलं नाही, तर मी माझ्या बापाची अवलाद नाही,” असा दावा माजी आमदार आणि दानवेंचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी केली आहे. यामुळे रावसाहेब दानवे विरुद्ध हर्षवर्धन जाधव हा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. रावसाहेब दानवे यांनी राजकीय दबावाने गुन्हे दाखल केल्याचा आरोप जाधव यांनी केला होता. त्यानंतर आता उच्च न्यायालयाने त्यांना दिलेल्या जामिनात राजकीय दबावाने गुन्हे दाखल झाल्याचे म्हटलं आहे. त्यामुळे “राज्य सरकारने यात लक्ष घालावं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही यात लक्ष घालावं,” अशी मागणी हर्षवर्धन जाधव यांनी केली आहे.

कोण आहेत हर्षवर्धन ?

हर्षवर्धन जाधव हे भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत.
हर्षवर्धन जाधव हे 2009 मध्ये मनसेच्या तिकिटावर कन्नड विधानसभा निवडणुकीत निवडून आले होते.
मात्र पाच वर्षांच्या आत त्यांनी पक्षांतर्गत मतभेदामुळे मनसेला सोडचिठ्ठी दिली होती.
त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. मात्र त्यांचा पराभव झाला.
2019 च्या विधानसभा निवडणुकीतही हर्षवर्धन जाधव यांना विजय मिळवता आला नाही.
शिवसेनेच्या उदयसिंग राजपूत यांनी त्यांचा पराभव केला.

संबंधित बातम्या :

जावई ना माझं ऐकतो, ना उद्धव ठाकरेंचं, खैरेंना ‘ती’ भीती : दानवे

आंदोलन प्रहारचं पण सासऱ्यांविरोधात जावई टाकीवर!

Harshvardhan Jadhav’s secret blast about Chandrakant Khaire