पवार, पाटील, दादा, ठाकरे त्या व्यक्तीसोबत… गिरीश महाजन यांनी थेट फोटोच दाखवले, राऊतांना करारा जवाब
खासदार संजय राऊत यांनी मंत्री गिरीश महाजन यांचा आणि लोढाचा एक फोचो शेअर करत या फोटोच्या चौकशीची मागणी केली होती. आता महाजन यांनी राऊतांना उत्तर दिले आहे.

राज्यात सध्या हनीट्रॅप प्रकरण चर्चेत आहे. यात आजी-माजी मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 70 पेक्षा जास्त जण अडकल्याचे सांगण्यात येत आहे. प्रफुल्ल लोढा हा व्यक्ती या हनी ट्रॅप मागे आहे. खासदार संजय राऊत यांनी मंत्री गिरीश महाजन यांचा आणि लोढाचा एक फोचो शेअर करत या फोटोच्या चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर आमदार एकनाथ खडसे यांनी या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करण्याची मागणी केली होती. या दोघांनाही गिरीश महाजन यांनी उत्तर दिले आहे.
गिरीश महाजन काय म्हणाले?
संजय राऊत यांनी मंत्री गिरीश महाजन यांचा प्रफुल्ल लोढा यांच्या सोबत फोटो ट्विट केला होता. यावर बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले की, प्रफुल्ल लोढा अनेक पक्षात होता. शरद पवार, जयंत पाटील, अजित पवार, उद्धव ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांच्या सोबत प्रफुल्ल लोढाचे फोटो आहेत. महाजन यांनी मोबाईलमध्ये हे सर्व फोटो दाखवले आहेत.
पुढे बोलताना महाजन यांनी, ‘प्रफुल्ल लोढासोबत फोटो असलेल्या उद्धव ठाकरे, शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांचा पण हनी ट्रॅप शी संबंध आहे का? या सर्वांची पण आता सीबीआय आणि एस आय टी चौकशी करायची का?’ असा सवाल उपस्थित केला आहे.
महाजनांचे खडसेंना उत्तर
एकनाथ खडसेंनी याप्रकरणी एसआयची चौकशीची मागणी केली होती. यावर बोलताना महाजन म्हणाले की, ‘एकनाथ खडसे हे प्रफुल्ल लोढा यांच्या एसआयटी चौकशीची मागणी करत आहेत, पण काही वर्षापूर्वी लोढा याने खडसे यांच्या मुलाच्या आत्महत्येच्या प्रकरणाच्या एसआयटी चौकशी मागणी केली होती. एकनाथ खडसे यांच्या मुलाचा मृत्यू कसा झाला? मग त्या प्रकरणाची आता चौकशी करायची का? असं महाजन यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना गिरीश महाजन यांनी म्हटले की, ‘मी एवढ्या खालच्या पातळीवर जाणार नाही, पण खडसे यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. कोणत्याही प्रकरणात मीच त्यांना दिसतो. कोणत्याही प्रकरणात खडसे माझा संबंध जोडून माझी बदनामी करतात. सध्या प्रफुल्ल लोढाला पोलिसांनी अटक केली आहे, पोलिस त्याची चौकशी करतील आणि जे सत्य समोर यायचे ते येईलच.’
