लबाड राष्ट्रवादीने शब्द देऊन फसवलं : हर्षवर्धन पाटील

लबाड राष्ट्रवादीने शब्द देऊन फसवलं : हर्षवर्धन पाटील

आघाडीधर्म पाळूनही राष्ट्रवादीने आपल्याला मदत केली नाही, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी केला आहे. इंदापुरात त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. दहा तारखेनंतर ते पक्षांतराविषयी निर्णय जाहीर करणार आहेत

अनिश बेंद्रे

|

Sep 04, 2019 | 4:57 PM

पुणे : लबाड राष्ट्रवादीने (NCP) शब्द देऊन फसवलं, आघाडीचा धर्म पाळूनही राष्ट्रवादीने अन्यायच केला. आमच्या सभ्यपणाचा फायदा राष्ट्रवादीने घेतला, अशा शब्दात काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील (Harshwardhan Patil) यांनी मनातली खदखद व्यक्त केली आहे. हर्षवर्धन पाटील यांचा भाजपप्रवेश जवळपास निश्चित मानला जात आहे. कार्यकर्त्यांचं मत जाणून घेण्यासाठी त्यांनी इंदापुरात मेळावा आयोजित केला होता. यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका करण्याची एकही संधी त्यांनी सोडली नाही. दहा तारखेनंतर ते पक्षांतराची घोषणा करणार आहेत.

सगळ्या जनतेच्या ज्या भावना आहेत, त्याच माझ्या भावना आहेत. तुमच्या भावनांचा आदर केला जाईल. ज्याचं जळतं त्याला कळतं, म्हणून आता पुढचा निर्णय घ्यावा लागेल, असं म्हणत हर्षवर्धन पाटील यांनी पक्षांतराचे अप्रत्यक्ष संकेत दिले. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीसाठी प्रामाणिकपणे काम केलं, पण काय मिळालं, असा सवाल त्यांनी व्यथित होऊन विचारला. मेळाव्यापूर्वी हर्षवर्धन पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेतली होती.

आपल्या आयुष्यात शब्द पाळणाऱ्यापेक्षा दगा देणाऱ्यांचीच नावं जास्त आहेत. 2009 मध्येही राष्ट्रवादीने माझ्या विरोधात बंडखोरी केली होती, फॉर्म मागे घेण्यासाठी शरद पवारांनी फोन केला होता, मात्र दुसरा फोन अर्ज मागे घेऊ नका असा आला. खूप अन्याय, अपमान, दगाबाजी सहन केली, मात्र इथून पुढे सहन करणार नाही. आमचा चांगुलपणा बघितला आता आमचा आक्रमकपणा बघा, असा इशाराही हर्षवर्धन पाटील यांनी दिला.

शरद पवारांनी मला लोकसभा निवडणुकीत मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी बोलवलं आणि त्याठिकाणी राष्ट्रवादीचं काम करण्याचं सांगितलं. त्यानंतर सुप्रिया सुळे माझ्या घरी भेटायला आल्या होत्या, त्यानंतर साडेचार वर्षांनंतर पहिल्यांदा अजित पवारांचा फोन आला भेटायला यायचं. दहा वेळा अजित पवारांनी फोन केला होता. आणि त्यानंतर मेळावा घेऊन काँग्रेसने सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दिला, असं हर्षवर्धन म्हणाले.

काँग्रेस एकत्र असताना भाऊंना काही कमी त्रास झाला. लोकसभेला भाऊंचं तिकीट कापून अजित पवारांना दिलं होतं. आज विजयदादांना भेटलो, लोकसभेवेळीच का आला नाही, अशी विचारणा त्यांनी केली, असं सांगताना हर्षवर्धन पाटलांकडून अजित पवार यांचा एकेरी भाषेत उल्लेख करण्यात आला.

लोकसभेच्या वेळी हर्षवर्धन पाटील हे सुप्रिया सुळेचे काम करतील मात्र तीन महिन्यांनंतर विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटलांचं काम त्यांना करावं लागेल, असं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पुण्यात सुप्रिया सुळे यांना बजावलं होतं, मग त्याचं काय झालं? असा सवाल पाटील यांनी विचारला. तुम्ही जर काँग्रेसला जागा सोडणार होतात, मग शिवस्वराज्य यात्रा इंदापुरात का आली? दौऱ्यात इंदापूर नव्हते मग कसे का आलात? आता यापुढे लबाड माणसांसाठी काम करायचं नाही, अशी दुखरी नस त्यांनी बोलून दाखवली.

माझ्या पुस्तक प्रकाशनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन तासांचा वेळ दिला, पीएला सांगून कॅबिनेट बैठक रद्द करून प्रकाशनाला आले, एकीकडे शब्द पाळणारे हे लोक तर दुसरीकडे दगा देणारे, असं म्हणत हर्षवर्धन पाटलांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं. यावेळी, हर्षवर्धन पाटलांनी भाजप प्रवेश करावा, अशा जोरदार घोषणा दिल्या जात होत्या.

बारामतीतून लोकसभा निवडणूक लढवावी म्हणून भाजप दोन महिने माझ्या मागे लागलं होतं, असा दावा हर्षवर्धन पाटील यांनी केला आहे. बारामती हा शरद पवारांचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघातच पवारांचं संस्थान खालसा करण्याचा विडा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उचलला होता. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना पराभूत करण्यासाठी हर्षवर्धन पाटलांना मैदानात उतरवण्याची तयारी भाजपने केली होती. मात्र हर्षवर्धन पाटलांनी नकार दिल्यामुळे अखेर रासप आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना रिंगणात उतरवण्यात आलं. मात्र टफ फाईट देणाऱ्या कांचन कुल यांना पराभव स्वीकारावा लागला होता.

भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी माझी कदर केली आणि मला आमदार केलं. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनीही मदत केली. वयाच्या 29 व्या वर्षी राज्यमंत्री केलं. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शब्दाला जागणारा माणूस होता. त्यांनी हाताला धरुन विलासराव देशमुखांकडे नेलं, असं हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं.

हर्षवर्धन पाटलांनी यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. पाटील यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांची कन्या अंकिता पाटील मेळाव्याला उपस्थित होती. मेळाव्याच्या माध्यमातून हर्षवर्धन पाटील समर्थकांकडून राष्ट्रवादीवर टीका करण्यात आली.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें