महाराष्ट्राला दीड कोटी लस देणार असल्यानं केंद्राची पुनावालांना तंबी, म्हणून ते लंडनला गेले : हसन मुश्रीफ

| Updated on: Jun 07, 2021 | 3:49 AM

"केंद्र सरकारने त्यांना तंबी दिली आणि त्यामुळे पुनावाला लंडनला जाऊन बसले," असा खळबळजनक आरोप राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलाय.

महाराष्ट्राला दीड कोटी लस देणार असल्यानं केंद्राची पुनावालांना तंबी, म्हणून ते लंडनला गेले : हसन मुश्रीफ
Follow us on

अहमदनगर : “सीरम कंपनीचे प्रमुख आदर पुनावाला राज्य सरकारला दीड कोटी कोरोना लसीचे डोस देणार होते. मात्र, त्याआधीच केंद्र सरकारने त्यांना तंबी दिली आणि त्यामुळे ते लंडनला जाऊन बसले,” असा खळबळजनक आरोप राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलाय. ते अहमदनगरला एका कार्यक्रमात बोलत होते. कोरोना लसीचं नियंत्रण केंद्राने हाती घेतले पाहिजे असंही मत मुश्रीफ यांनी व्यक्त करत केंद्र सरकारवर टिका केलीये (Hasan Mushrif serious allegation on Modi government about threat to Adar Poonawala).

हसन मुश्रीफ म्हणाले, “जे फ्रंटलाईनला काम करत आहेत त्यांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले पाहिजेत. कोरोना लसींचं सर्व नियंत्रण केंद्राने आपल्या हातात घेण्याची आवश्यकता आहे. मात्र, केंद्र सरकार 45 वर्षांवरील ते करणार आणि 18-44 वयोगटातील राज्यांनी करावं असं सांगत आहे हे बरोबर नाही. आम्ही ग्लोबल टेंडर काढलं. कोरोना लसीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 6 हजार कोटी रुपये एकरकमी देण्याची तयारी केली. असं असूनही कुठलीही लस उत्पादक कंपनी आमच्यासोबत बोलायला तयार नाही. या कंपन्या म्हणतात की आम्ही केंद्र सरकारसोबत बोलू.”

“कोरोना लसींवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रीय धोरण आखावं”

“दुसरीकडे केंद्र सरकार आपतकालीन परवानगीही देत नाहीय. काल परवा अखेर त्या मॉडर्ना आणि फायझरला परवनगी मिळालीय. त्यामुळे कोरोना लसींवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रीय धोरण आखावं. असं झालं तर 6 महिन्यात संपूर्ण लसीकरण होईल. आपल्या देशाची लोकसंख्या 130 कोटी आहे. त्यातील 10 वर्षांची मुलं सोडली तर बाकीच्यांना आपण दोन डोस कसे देणार याची व्यवस्था केंद्राने करावी,” असं हसन मुश्रीफ यांनी सांगितलं.

“महाराष्ट्राला दीड कोटी लस देणार असल्यानं केंद्राची पुनावालांना तंबी, म्हणून ते लंडनला गेले”

मुश्रीफ म्हणाले, “महाविकास आघाडी सरकारने राज्यात 18-44 वयोगटातील नागरिकांना मोफत लसीची घोषणा केली. त्यासाठी आपण ग्लोबल टेंडर काढली. त्यानंतर काही कंपन्या म्हणाल्या आम्ही तुमच्यासोबत नाही केंद्र सरकारसोबत बोलू. पुण्यात असलेली सीरम कंपनीचे प्रमुख अदर पुनावाला यांनी जूनपासून दीड कोटी कोरोना लसी देण्याचं ठरवलं होतं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना केंद्र सरकारने तंबी दिली आणि ते लंडनला जाऊन बसले. महाराष्ट्रात तयार होणारी कोरोना लसही आपल्याला दिली जात नाहीये. एकीकडे हे राज्यांना लसीकरण करायला लावतात, दुसरीकडे लस उत्पादकांना धमक्या द्यायच्या ही पद्धत बरोबर नाही.”

“आम्हीही कोरोना लसीवर ठाकरे, पवार आणि थोरातांचे फोटो छापू”

दरम्यान मुश्रीफ यांनी लसीकरण प्रमाणपत्रांवर छापण्यात येणाऱ्या फोटोंवरुन टोलेबाजी केली. “ममता बॅनर्जींनी लसीकरण करुन 18-44 वयोगटाच्या प्रमाणपत्रावर आपला फोटो छापून टाकला. आता 45 वर्षांवरील नागरिकांच्या प्रमाणपत्रावर मोदी आणि उर्वरित प्रमाणपत्रांवर ममतांचा फोटो आहे. मग आता आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांचा फोटो छापू,” असं म्हणत त्यांनी हे काय चाललंय कळत नसल्याचं मत व्यक्त केलं.

“मोदींनी बायडन आणि हॅरिस यांच्याविरोधात प्रचार करुनही त्यांनी भारताला 25 कोटी लसी दिल्या”

हसन मुश्रीफ म्हणाले, “अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी भारताला 25 कोटी कोरोना लसी देणार असल्याचं मोदींना सांगितलं. त्यांचं किती मोठं मन आहे. याच मोदींनी बायडन आणि हॅरिस यांच्या विरोधात प्रचार केला होता. नमस्ते ट्रम्प हा कार्यक्रम आयोजित करत त्यांनी कोरोना काळात ट्रम्पला अहमदाबादला आणलं होतं. तरीही बायडन आणि हॅरिस यांनी मनात राग न धरता कोरोना लसी देऊ केल्या आहेत. हॅरिस भारतीय वंशाच्या आहेत. मी त्या दोघांचंही अभिनंदन करतो.”

संबंधित व्हिडीओ पाहा :

हेही वाचा :

विनायक मेटे भाजपचेच, गुणरत्न सदावर्तेंचं भाजपशी कनेक्शन आहे काय?; हसन मुश्रीफ यांची टोलेबाजी

लॉकडाऊन करुनही फारसा फायदा झाला नाही: हसन मुश्रीफ

‘गुणरत्न सदावर्ते मराठा आरक्षणविरोधी; भाजप आणि त्यांच्या संबंधांचा तपास करा’

Hasan Mushrif serious allegation on Modi government about threat to Adar Poonawala