मीदेखील विरोधी पक्षनेता होतो, पण संकटाच्या काळात कधीही असला खेळ खेळला नाही; खडसेंनी फडणवीसांना फटकारले

देवेंद्र फडणवीस जे करत आहेत, ते विरोधी पक्षनेत्याकडून अपेक्षित नाही | Eknath Khadse Devendra Fadnavis

मीदेखील विरोधी पक्षनेता होतो, पण संकटाच्या काळात कधीही असला खेळ खेळला नाही; खडसेंनी फडणवीसांना फटकारले
एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस

जळगाव: राज्यातील भीषण कोरोना परिस्थितीत रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या मुद्द्यावरुन सुरु असलेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. मीदेखील राज्याचा विरोधी पक्षनेता म्हणून काम केले आहे. पण संकटाच्या काळात कधीही असला खेळ खेळलो नाही, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले. (NCP leader Eknath Khadse slams BJP leader Devendra Fadnavis)

ते रविवारी जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराच्या ठिकाणी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांना खडे बोल सुनावले. महाराष्ट्रात ज्या ज्या वेळी संकट आले अथवा आकस्मिक संकटाचा प्रसंग उद्भवला, मग तो किल्लारीचा भूकंप असो किंवा मुंबईत झालेले साखळी बॉम्बस्फोट असोत, अशावेळी राजकारण बाजूला ठेवून विरोधी पक्ष व सत्ताधारी पक्षाने हातात हात घालून काम केले आहे. विरोधी पक्षनेता म्हणूनही मी सुद्धा काम केले आहे. पण, संकटाच्या काळात असा कुत्रा-मांजराचा खेळ कधी खेळला नाही. देवेंद्र फडणवीस जे करत आहेत, ते विरोधी पक्षनेत्याकडून अपेक्षित नाही, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले. त्यामुळे आता भाजपकडून एकनाथ खडसे यांना काय प्रत्युत्तर दिले जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

केंद्र सरकारने वेळीच रेमडेसिव्हीर इंजेक्शनची निर्यातबंदी केली असती तर आपल्याला मोठ्या प्रमाणावर साठा उपलब्ध झाला असता. मग केंद्राने वेळीच निर्यातबंदी का केली नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

फडणवीसांच्या तारखेची वाट पाहतोय: खडसे

देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत अमूक तमूक तारखेला सरकार पडेल, अशा वल्गना केल्या आहेत. आपल्या पक्षातील आमदार फुटू नयेत म्हणून ते जीवाचा आटापीटा करत आहेत. मला वाटलं फडणवीस उत्तम भविष्यकार असतील. मात्र, त्यांनी आतापर्यंत चार ते पाचवेळा सांगूनही सरकार पडले नाही. आता त्यांनी पुन्हा दोन तारीख दिली आहे. मी दोन तारखेची वाट पाहतो आहे. जर दोन तारखेला सरकार पडले नाही, तर त्यांचा भविष्यकार म्हणून अभ्यास कमी आहे असे मी समजेन, असा टोलाही एकनाथ खडसे यांनी लगावला.

संबंधित बातम्या:

VIDEO: ‘त्या’ कंपनीच्या मालकासाठी देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे नेते इतक्या तातडीने पोलीस ठाण्यात का गेले?

फार्मा कंपनीकडे रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा मोठा साठा? मुंबई पोलिसांनी मालकाला घेतले ताब्यात; फडणवीस पोहोचले पोलीस ठाण्यात

महाराष्ट्र सरकारला 50 हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शन, भाजपची गुजरातमधून मोठी घोषणा

(NCP leader Eknath Khadse slams BJP leader Devendra Fadnavis)

Published On - 3:57 pm, Sun, 18 April 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI