सत्तेत आल्यानंतर हा महत्त्वाचा निर्णय घेणार, अजित पवारांची घोषणा

सत्तेत आल्यानंतर हा महत्त्वाचा निर्णय घेणार, अजित पवारांची घोषणा

बारामती : अनेकजण दारु पिऊन गाड्या चालवतात आणि अपघात होतात. मात्र त्याचा भुर्दंड शिस्तीत वाहन चालवणारांनाही बसतो. त्यामुळेच दारु पिऊन वाहन चालवणार्‍या चालकांचा परवानाच कायमचा रद्द केला पाहिजे, असं स्पष्ट मत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलंय. इतकंच नव्हे, तर आपली सत्ता आल्यानंतर याबाबत निर्णय घेऊ, असंही त्यांनी सांगितलं.

याचवेळी अजित पवारांनी उपमुख्यमंत्री असताना एका ट्रकने धडक दिल्याची आठवणही सांगितली. रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने बारामतीच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आलेल्या अजित पवार यांनी समाधान घंटा या उपक्रमाची माहिती घेऊन घंटाही वाजवत मंदिरात आल्यासारखं वाटत असल्याचं सांगितलं.

बारामती येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताहाअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा आणि दुचाकी रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचं उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झालं. यावेळी बोलताना अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री असताना नवी मुंबई येथे एका ट्रकने ताफ्यात असलेल्या आपल्या गाडीला धडक दिल्याचं सांगितलं. त्यावेळी गृहमंत्री असलेल्या स्व. आर. आर. पाटील यांनी हा घातपात असल्याची शंका व्यक्त केली होती. मात्र प्रत्यक्षात अपघातावेळी पाहिलं तेव्हा चालक दारुच्या नशेत असल्याचं आढळलं होतं.

वास्तविक अनेक अपघात दारु पिऊन गाडी चालवल्यामुळे होतात. त्याचा फटका शिस्तीचं पालन करणार्‍यांनाही बसतो. त्यामुळेच अशा चालकांचा परवाना कायमचा रद्द केला पाहिजे, असं आपलं स्पष्ट मत असून आपली सत्ता आल्यास आपण हा निर्णय घेऊ असं अजित पवार यांनी म्हटलंय.

दरम्यान, बारामतीच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात समाधान घंटा हा उपक्रम सुरु करण्यात आलाय. या कार्यालयात येणार्‍या नागरिकांची कामं झाल्यानंतर घंटा वाजवून प्रतिक्रिया देण्याची ही पद्धत सुरु करण्यात आली आहे. याची माहितीही अजित पवार यांनी घेतली. विशेष म्हणजे, ही घंटा वाजवून अजित पवार यांनी मंदिरात आल्यासारखं वाटत असल्याचं सांगितलं.

Published On - 11:26 pm, Fri, 8 February 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI