विधानसभेसाठी भाजपची खलबतं, महाराष्ट्रातील निम्मे मंत्रिमंडळ दिल्लीत

राज्य भाजपमधील सर्व मोठे नेते या बैठकीला हजर राहणार आहे आणि स्वत: अमित शाह यांच्या उपस्थितीत बैठक होणार असल्याने बैठकीचे महत्त्व प्रचंड वाढले आहे.

विधानसभेसाठी भाजपची खलबतं, महाराष्ट्रातील निम्मे मंत्रिमंडळ दिल्लीत
BJP

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका आणि राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार यासंदर्भात दिल्लीत भाजपची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थिती ही बैठक होणार असून, या बैठकीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह राज्यातील भाजपचे जवळपास सर्वच मंत्री दिल्लीत या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

कुठल्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता?

 • राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार : देवेंद्र फडणवीस सरकारचा शेवटचा मंत्रिमंडळ विस्तार येत्या काही दिवसात होण्याची शक्यता आहे. या शेवटच्या विस्तारात काही नव्या चेहऱ्यांना मंत्रिपदी संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
 • महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणूक : तीन ते चार महिन्यावर राज्यातील विधानसभा निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. या निवडणुकांच्या दृष्टीने भाजपची आजची बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
 • महाराष्ट्र भाजपचा प्रदेशाध्यक्ष : भाजपचे विद्यमान महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे केंद्रीय राज्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या ठिकाणी नव्या प्रदेशाध्यक्षाची निवड केली जाऊ शकते.

बैठकीला कोण कोण उपस्थित राहणार?

भाजपच्या दिल्ली मुख्यालयात होणारी ही बैठक राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल.

 • भाजप संघटन सरचिटणीस रामलाल
 • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,
 • केंद्रीय मंत्री व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे
 • रवींद्र चव्हाण
 • जयकुमार रावल
 • संभाजी निलंगेकर
 • सुभाष देशमुख
 • विनोद तावडे
 • पंकजा मुंडे
 • चंद्रकांत पाटील
 • गिरीश महाजन
 • सुधीर मुनगंटीवार

राज्य भाजपमधील सर्व मोठे नेते या बैठकीला हजर राहणार आहे आणि स्वत: अमित शाह यांच्या उपस्थितीत बैठक होणार असल्याने बैठकीचे महत्त्व प्रचंड वाढले आहे. या बैठकीत भाजप नेमका काय निर्णय घेते, कुठल्या विषयावर चर्चा केली जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजप मुख्यालयात बैठक होण्याआधी, महाराष्ट्र सदनात महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत राज्यातील भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI