Uddhav Thackeray vs Sharad Pawar : या जिल्ह्यात महाविकास आघाडी फुटली, सामना शरद पवार विरुद्ध उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray vs Sharad Pawar : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काही ठिकाणी मित्र हा मित्र राहिला नसल्याचं चित्र आहे. पक्षीय महत्वकांक्षा मित्रत्वावर वरचढ ठरली आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात चांगेल मित्रत्वाचे संबंध आहेत. पण आता मात्र या दोन्ही नेत्यांचे पक्ष परस्पराविरोधात उभे ठाकले आहेत.

महाराष्ट्रात सध्या राजकारण तापलं आहे. त्याला कारण आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगर पंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. त्यानंतर जानेवारी महिन्यात जिल्हा परिषदा आणि महापालिकेच्या निवडणुका लागू शकतात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पक्ष आणि कार्यकर्ते दोघांच्या दृष्टीने खूप महत्वाच्या असतात. कारण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या माध्यमातून पक्ष विस्तार आणि कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त संधी ही दोन्ही उद्दिष्ट्य साध्य करता येतात. एरवी आमदारकी, खासदारकीच्या निवडणुकीत सर्वच कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही. पण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यकर्त्यांच नेतृत्व विकसित करायला चांगला वाव असतो. त्यातूनच भविष्यातले आमदार, खासदार, मंत्री घडतात.
महाराष्ट्रात नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्याआधी स्थानिक पातळीवर बऱ्याच घडामोडी वेगाने घडत आहेत. राज्याच्या राजकारणात परस्परांचे मित्र असलेले, एकत्र सत्तेत सहभागी असलेले पक्ष या निवडणुकीत परस्पराविरोधात उभे ठाकल्याच चित्र आहे. त्याला कारण आहे, स्थानिक पातळीवरील राजकारण. नगरपालिका, नगर पंचायत निवडणुकीत काही ठिकाणी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस तिघे परस्पराविरोधात निवडणूक लढवत आहे. कुठे भाजप-शिवसेना एकत्र राष्ट्रवादी विरोधात, तर कुठे शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र भाजप विरोधात असं चित्र आहे. सगळी स्थानिक पातळीवरील समीकरणांची जुळवाजुळव करुन या आघाड्या आकाराला येत आहेत.
महाविकास आघाडीत फूट पडली
आता शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात चांगले मित्रत्वाचे संबंध आहेत. कौटुंबिक नातं आहे. दोन्ही पक्ष महाविकास आघाडीमध्ये एकत्र आहेत. अनेक आंदोलनात दोन्ही पक्ष एकत्र दिसले आहेत. पण आता नगरपालिका आणि नगर पंचायत निवडणुकीत मात्र शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना काही ठिकाणी आमने-सामने आल्या आहेत. धाराशिवमध्ये महाविकास आघाडीत फूट पडली आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर लढणार आहे. महाविकास आघाडीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाबरोबर जागा वाटपावरून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे मतभेद झाले आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला महाविकास आघाडीमधून 41 पैकी 6 जागा दिल्या होत्या. जिल्ह्यातील तुळजापूर नगरपालिका वगळता सात नगरपालिका शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष स्वतंत्र लढणार असल्याची माहिती आहे.
