पंकजांसमोर धनंजय मुंडे म्हणाले, या मतदारसंघाची जबाबदारी माझ्या खांद्यावर घेतो!

धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) हे आज एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले.

पंकजांसमोर धनंजय मुंडे म्हणाले, या मतदारसंघाची जबाबदारी माझ्या खांद्यावर घेतो!
धनंजय मुंडे- पंकजा मुंडे

बीड : राज्याच्या राजकारणातील दोन बडे चेहरे, बहीण भाऊ म्हणजेच सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) हे आज एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले. एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू असलेले दोन्ही नेत्यांना गहिनीनाथ गडाने (Gahininath Gad) एकाच मंचावर आणलं. हे चित्र पाहण्यासाठी बीडकरांची गर्दी लोटली होती. यावेळी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोघांनीही उपस्थितांना संबोधित केलं. पंकजा मुंडे मंचावर असताना धनंजय मुंडे यांनी भाषण केलं. या मतदारसंघाची जबाबदारी माझ्या खांद्यावर घेतो, असं धनंजय मुंडे म्हणाले. (In front of Pankaj Munde, Dhananjay Munde said, I take the responsibility of this constituency!)

धनंजय मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघात (Beed Parli Constituency) पंकजा मुंडे यांचा पराभव केला. खरंतर पंकजा मुंडे परळी या विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्त्व करत होत्या. मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी तत्कालिन महिला बालकल्याण मंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांचा पराभव केला होता. त्यामुळे आता धनंजय मुंडे यांच्याकडे या मतदारसंघाचं नेतृत्त्व आलं आहे.

गहिनीनाथ गडावरील कार्यक्रमाच्या मंचावरुन धनंजय मुंडेंनी या मतदारसंघाचं नेतृत्त्व आपल्या खांद्यावर घेण्याचं भाष्य केलं, त्यामुळे दोन्ही भाऊ-बहीण एकाच मंचावर आले असले, तरी राजकीय कुरघोडी झालीच.

धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले?

संत वामनभाऊंवर, गडांच्या भक्तांवर, या सर्वांवर आपण असंच प्रेम आणि आशिर्वाद ठेवा. या गडाची, या मतदारसंघाची आणि बीड जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या साक्षीने माझ्या खांद्यावर घेतो, असं धनंजय मुंडे म्हणाले.

अनेक वर्ष आपला जिल्हा पिछाडीवर आहे. आपल्या जिल्हाला ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून संबोधलं जातं. मात्र येणाऱ्या या चार वर्षात जिल्ह्याच्या समोरचं मागासलेपण हटवून, ऊसतोड मजुरांचा नाही तर ऊस पिकवणाऱ्यांचा जिल्हा अशी ओळख देण्याचं आव्हान आम्ही स्वीकारलेलं आहे, असं धनंजय मुंडेंनी आश्वासन दिलं.

अनेक संकटं येतात जातात, मी कुठल्या संकटाला घाबरलो नाही. आताच्या संकटाचा उल्लेखसुद्धा एका महंतांनी केला. अशी किती जरी संकटं आली, तरी जनतेच्या मनात आपण स्थान निर्माण केलं असेल तर आशिर्वाद कधीच कमी पडत नाही. आजच्या या संकटातसुद्धा तुमचे आशिर्वाद माझ्या पाठिशी आहेत. देव तारी त्याला कोण मारी, तुम्हीच माझ्यासाठी देव आहात. जगातलं कुठलं मोठं पद, भविष्यात कोणतं महत्त्वाचं पद मिळेल की नाही माहित नाही, पण पुण्यतिथीच्या पूजेचं, या पवित्र पूजेची जबाबदारी जी तुम्ही दिली, आयुष्यात माझ्यासाठी सर्वात मोठं पद कोणतं असेल तर ती पुण्यतिथीची पूजा आहे, ती मला आज या गडातून मिळालं. यापेक्षा जास्त काही बोलणार नाही.

माजी पालकमंत्री म्हणाल्या आता आमची जबाबदारी विकासाची आहे आणि त्यासाठी शुभेच्छा पण दिल्या. त्यांना अनेक वर्षे आम्हाला शुभेच्छा द्याव्या लागतील असा विकास करू, असा टोमणा धनंजय मुंडे यांनी पंकजांना लगावला.

आता ज्यांच्या हातात सत्ता मिळालीय ते नक्कीच चांगला विकास करतील यासाठी शुभेच्छा, असं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या.

संबंधित बातम्या  

धनंजय मुंडेंपाठोपाठ पंकजाही गहिनीनाथ गडावर, मुंडे बहीण-भाऊ एकाच व्यासपीठावर

Published On - 4:13 pm, Fri, 5 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI