कन्हैया लोकसभेच्या रिंगणात, मतदारसंघही ठरला

कन्हैया लोकसभेच्या रिंगणात, मतदारसंघही ठरला

पाटणा : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बिहारमधील बेगूसराय लोकसभा मतदारसंघात महत्त्वपूर्ण लढत होणार आहे. या मतदारसंघात भाजपकडून गिरिराज सिंह यांच्या विरोधात जेएनयू विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार मैदानात उतरणार आहे. युवा नेता कन्हैया कुमार भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून बेगूसराय मतदारसंघात लोकसभा निवडणूक लढवणार आहे. भाकपचे नेते सुरवरम सुधाकर रेड्डी यांनी याबाबतची घोषणा केली.

बिहारच्या बेगूसराय मतदारसंघात भाजपासमोर कन्हैया कुमारचं कडवं आव्हान असणार आहे. कारण भाकपचा बालेकिल्ला म्हणून बेगूसराय मतदारसंघ ओळखला जातो. या मतदारसंघाला मॉस्को ऑफ बिहार म्हणूनही ओळखले जाते. मात्र गिरिराज सिंह आपल्या पूर्वीच्या नवादा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.  पण भाजपने गिरिराज सिंह याचे राजकीय वजन आणि जात लक्षात घेऊन त्यांना या मतदारसंघात उतरवले आहे. कन्हैया आणि गिरिराज सिंह या दोघांची जात एकच आहे.

कन्हैया कुमारला महागठबंधनाचा पाठिंबा?

कन्हैया कुमारला महागबंधन पाठिंबा करणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. सीपीआय महागठबंधनात सहभागी झाले नसले, तरी महागठबंधन कन्हैयाला पाठिंबा देईल अशी चर्चा सुरु आहे. यामुळे गिरिराज सिंह यांना जोरदार फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण गिरिराज सिंह यांच्यासाठी हा नवीन मतदारसंघ आहे.

मतदाससंघ बदलल्यामुळे गिरिराज सिंह नाराज

गिरिराज सिंह आपला पूर्वीचा मतदारसंघ न मिळाल्यामुळे नाराज असल्याचे दिसत आहे. आताही ते आपला मतदारसंघ बदलण्यासाठी अमित शाह यांच्या कार्यालयात जात आहे. नवादा लोकसभा मतदारसंघात लोकजन शक्ती पार्टीच्या चंदन कुमार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने उमेदवारी यादी जाहीर केल्यानंतरच गिरिराज सिंह यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली होती.

गिरिराज सिंह म्हणाले, “मी माझ्या लोकसभा मतदारसंघात एवढे काम करुनही मला माझ्या  मतदारसंघाचे तिकीट दिलं नाही”.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI