माढा विधानसभा आढावा | बबनराव शिंदे यांच्यासमोर कोणकोणती आव्हाने?

माढा विधानसभा मतदारसंघ (Madha Vidhan sabha) हा नेहमीच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मागे भक्कमपणे उभा राहिला आहे. सध्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे हे 1995 पासून इथे प्रतिनिधित्व करत आहेत.

माढा विधानसभा आढावा | बबनराव शिंदे यांच्यासमोर कोणकोणती आव्हाने?
सचिन पाटील

|

Sep 09, 2019 | 10:09 AM

Madha Vidhan sabha सोलापूर : माढा विधानसभा मतदारसंघ (Madha Vidhan sabha) हा नेहमीच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मागे भक्कमपणे उभा राहिला आहे. सध्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे हे 1995 पासून इथे प्रतिनिधित्व करत आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर मात्र माढ्याचा तिढा आता वाढणार आहे. कारण भाजप शिवसेनेने इथे चांगली मते मिळवली आहेत. तर राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा आहे. माढ्यातली निवडणूक चुरशीची होणार हे आता स्पष्ट झाले आहे.

माढ्याचे विद्यमान आमदार बबनराव शिंदे यांनी युती सरकारच्या काळात या तालुक्यासाठी वरदान ठरलेली सीना- माढा उपसा सिंचन योजना आणली. माळरान असलेल्या माढ्याचे नंदनवन झाले. यामुळे इथे साखर कारखानदारी बहरली. यामुळेच आमदार शिंदे यांनी या विधानसभा मतदारसंघातील राजकारणावर आपली पकड ठेवली. एकेकाळी दुष्काळी असलेला तालुका बागयाती झाला. मात्र अजूनही उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना बाहेर जावे लागते.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत आमदार बबनराव शिंदे यांचे बंधू संजयमामा शिंदे यांचा पराभव झाला. यामुळे एकछत्री वर्चस्व असलेल्या शिंदेंच्या राजकारणाला धक्का बसला. यानंतर काही महिन्यातच शिंदे बंधू भाजप नेत्यांकडे हेलपाटे मारू लागल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा आता सुरू झाली आहे.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत आमदार बबनराव शिंदे यांनी तीस हजार मतांच्या फरकाने काँग्रेसचे कल्याण काळे यांचा पराभव केला होता. तर शिवसेनेचे शिवाजीराव सावंत यांनी 40 हजार मते मिळाली होती. यंदा जर भाजप आणि सेनेची युती झाली तर आमदार बबनराव शिंदे यांना निवडून येण सहजासहजी शक्य नाही. यातच आमदार शिंदे याचे माढ्यातील विरोधक सावंत यांची मंत्री मंडळात वर्णी लागली आहे. यामुळे शिवसेनेने ही जागा प्रतिष्ठेची केली आहे.सध्या तरी युतीच्या जागा वाटपात ही जागा सेनेकडे आहे.

यंदा विधानसभा निवडणुकीसाठी आमदार शिंदे राष्ट्रवादीकडून लढले तर शिवसेनकडून पुन्हा शिवाजी सावंत यांच्याशी लढत होईल.जर ही जागा भाजपने आपल्याकडे घेतली तर गेल्या वर्षी दोन नंबरची मते घेतलेले कल्याण काळे हे भाजपचे उमेदवार असू शकतात. याशिवाय भाजपकडून संजय कोकाटे,दादासाहेब साठे यांची नावे चर्चेत आहेत.

मात्र माढा लोकसभा मतदारसंघाप्रमाणे माढा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीला हद्दपार करायचे असेल तर भाजप सेना युती होणे महत्वाचे आहे.तरच आमदार शिंदे यांचा पराभव होऊ शकतो.

2014 चा निकाल

  • बबनराव शिंदे – ९७ हजार ८०३
  • कल्याणराव काळे- ६२०२५
  • शिवाजी सावंत- ४० हजार ६१६
  • दादासाहेब साठे – १४ हजार १४९

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें