कांशीराम यांच्यापासून प्रेरणा; महादेव जानकरांच्या तीन भीष्म प्रतिज्ञा; वाचा, कसा आहे राजकीय प्रवास!

राज्यात देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आलं आणि महादेव जानकर हे कॅबिनेट मंत्री झाले. तोपर्यंत जानकर आणि त्यांचा राष्ट्रीय समाज पक्ष कुणालाच माहीत नव्हता. (mahadev jankar a maharashtra politician, who inspired by kanshiram)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 19:43 PM, 13 Apr 2021
कांशीराम यांच्यापासून प्रेरणा; महादेव जानकरांच्या तीन भीष्म प्रतिज्ञा; वाचा, कसा आहे राजकीय प्रवास!
mahadev jankar

मुंबई:राज्यात देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आलं आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे कॅबिनेट मंत्री झाले. तोपर्यंत जानकर आणि त्यांचा राष्ट्रीय समाज पक्ष कुणालाच माहीत नव्हता. फोर्ट येथील दलाल स्ट्रीटवर जानकर यांच्या पक्षाचं कार्यालय फक्त त्यांच्या कार्यकर्त्यांखेरीज कुणाला माहीत नव्हतं. मात्र, भाजपचे ज्येष्ठ दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी डोक्यावर ठेवलेला हात, राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळेंविरोधात बारामतीतून दिलेली लढत आणि फडणवीस यांच्या सरकारात मिळालेलं मंत्रिद यामुळे फडणवीस चर्चेत आले आणि महाराष्ट्राच्या राजकारणात दखलपात्रंही झाले. (mahadev jankar a maharashtra politician, who inspired by kanshiram)

कांशीराम यांचा प्रभाव

महादेव जानकर यांचा जन्म 19 एप्रिल 1968 रोजी सातारा जिल्ह्यातील पळसावडे येथे झाला. धनगर समाजात जन्मलेल्या जानकरांची घरची स्थिती चांगली होती. लहानपणापासून त्यांना अन्याय अत्याचार सहन होत नसायचा. जानकर यांना डॉक्टर व्हायचं होतं. पण मार्क कमी पडल्याने ते इंजीनियर झाले आणि त्यांनी एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी पत्करली. सांगलीच्या वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांनी अभियांत्रिकी शिक्षण घेतलं. नोकरीत चांगला पैसा मिळत होता. पण नोकरती त्यांचं मन रमलं नाही. याच काळात ते बसपाचे संस्थापक कांशीराम यांच्या संपर्कात आले आणि खऱ्या अर्थाने त्यांना सामाजिक, राजकीय चळवळीची प्रेरणा मिळाली.

आठवलेंचे फॅन

महादेव जानकर हे कॉलेजात असताना रिपाइं नेते रामदास आठवले आणि शिवाजी शेंडगे यांचे फॅन होते. त्यांना आठवलेंची भाषण आवडायची. तसेच पँथर म्हणून त्यावेळी असलेली आठवलेंची आक्रमकता आणि संघटन कौशल्य यामुळे ते भारावून गेले होते.

तीन प्रतिज्ञा

1993मध्ये यशवंत सेनेत दाखल झाल्यानंतर जानकर यांनी कांशीराम यांच्याप्रमाणे तीन प्रतिज्ञा केल्या. आयुष्यभर अविवाहित राहणार, कुटुंबाशी कोणत्याही प्रकारे नातेसंबंध ठेवणार नाही आणि कधीच घरी जाणार नाही. त्यांच्या या प्रतिज्ञेप्रमाणेच ते वागले. वडील वारल्यानंतर 22 वर्षानंतर घरी गेले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वी त्यांची आई वारली, तेव्हा ते घरी गेले होते. ते गावाजवळच्या गावात कार्यक्रमाला जातात. पण घरी जात नाही. मी तुमचा नाही, समाजाचा आहे, असं सांगून ते घरी जायला ठाम नकार देतात.

गावोगावी पायपीट

1989पासून त्यांनी गावोगावी जाऊन लोकांशी संपर्क वाढवला. त्यांनी आठरापगड जातींना एकत्र करण्याचा प्रयत्न केला. विशेष करून धनगर समाजाला एकत्रित करून त्यांच्यात राजकीय महत्त्वकांक्षा त्यांनी निर्माण केली. 2003 मध्ये त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना केली. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या नगरमधील चौंडी या जन्मस्थळी त्यांनी राजकीय पक्षाची स्थापना केली. फुले-आंबेडकरी विचारधारा आणि अहिल्यादेवींचं लोककल्याणाचं धोरण हा त्यांच्या पक्षाचा बेस आहे. ही विचारधारा घेऊनच त्यांनी गावोगावी जाऊन पक्ष बांधणीला सुरुवात केली.

वेड्यात काढलं

एकेकाळी गावातील लोकांनी जानकरांना वेड्यात काढलं होतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानतो म्हणून त्यांना गावकऱ्यांनी वेडा धनगर ठरवलं होतं. ते लोक आज जानकरांना साहेब म्हणून हाक मारतात. आज त्याच जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष हा देशातील 17 राज्यात आहे. या पक्षाचा इतर राज्यात प्रभाव क्षीण आहे. मात्र, या राज्यांमध्ये शाखा निर्माण करण्यात त्यांनी यश मिळवलं आहे. त्यांच्या पक्षाचे दोन आमदार, 98 जिल्हा परिषदेत सदस्य, गुजरातमध्ये 28 नगरसेवक आहेत.

चार लोकसभा लढल्या

जानकर यांनी लोकसभा निवडणुकीत मातब्बर लोकांनाच आव्हान दिलं. त्यांनी नांदेड (1998), सांगली (2006), माढा(2009), बारामती (2014) अशा चार लोकसभाही जानकरांनी लढवल्या. प्रत्येक निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. पण जानकर पराभूत होऊनही चर्चेत राहिले. (mahadev jankar a maharashtra politician, who inspired by kanshiram)

 

संबंधित बातम्या:

पहिल्यांदाच आमदार आणि मंत्रीही, ‘मामांची कृपा?’; वाचा, कोण आहेत प्राजक्त तनपुरे?

प्राध्यापिका ते पहिल्या महिला शिक्षण मंत्री; वाचा, वर्षा गायकवाडांची राजकीय भरारी!

शिवसेना ते शिवसेना, व्हाया राष्ट्रवादी; असा आहे भास्कर जाधवांचा राजकीय प्रवास!

(mahadev jankar a maharashtra politician, who inspired by kanshiram)