मुंबई काँग्रेसच्या डोक्यावर आता प्रदेश काँग्रेस?; काँग्रेसमध्ये चाललंय काय?

काँग्रेसने भाई जगताप यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड केली असली तरी त्यांच्या अधिकारांना कात्रीही लावली आहे. (Maharashtra congress president will interfere in mumbai congress?)

मुंबई काँग्रेसच्या डोक्यावर आता प्रदेश काँग्रेस?; काँग्रेसमध्ये चाललंय काय?

मुंबई: काँग्रेसने भाई जगताप यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड केली असली तरी त्यांच्या अधिकारांना कात्रीही लावली आहे. मुंबई काँग्रेसच्या निवड समिती आणि स्ट्रॅटेजी समितीचे चेअरमनपद काँग्रेसने प्रदेशाध्यक्षांकडे दिलं आहे. मुंबई काँग्रेसमध्ये होणाऱ्या तिकीट वाटपाचा घोळ लक्षात घेऊन काँग्रेस हायकमांडने मुंबई काँग्रेसच्या डोक्यावर प्रदेशाध्यक्षांनाच बसवून मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षांची दात नखेच काढून घेतल्याचं बोललं जात आहे. काँग्रेस श्रेष्ठींच्या निर्णयामुळे मुंबई काँग्रेसची स्वायत्ताच गेली असून हे पद निव्वळ शोभेची बाहुली बनल्याचं राजकीय निरीक्षक सांगत आहेत. (Maharashtra congress president will interfere in mumbai congress?)

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष या दोन्ही स्वायत्त संस्था होत्या. मुंबईतील कोणताही धोरणात्मक निर्णय आणि पालिका निवडणुकीतील तिकीट वाटपाचा निर्णय सर्वस्वी मुंबई काँग्रेसच घ्यायची. त्यासाठी मुंबई प्रदेशाध्यक्षांच्या अंतर्गत स्क्रीनिंग समिती आणि स्ट्रॅटेजी समितीही यायची. मात्र, काँग्रेसने पहिल्यांदाच या दोन्ही समित्यांचं चेअरमनपद महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षांकडे सोपवलं आहे. त्यामुळे मुंबई काँग्रेस अध्यक्षांच्या अधिकारांवरच गदा आली असून मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद हे शोभेची वस्तू झाल्याचं राजकीय निरीक्षक सांगत आहेत.

मुरली देवरांचे प्रयत्न

मुंबई काँग्रेसला स्वायत्ता असावी, पालिका निवडणुकीत तिकीट वाटप करण्याचा आणि मुंबईबाबतचे पक्षाचे धोरणं ठरण्याचा अधिकार मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षांना देण्यासाठी दिवंगत काँग्रेस नेते मुरली देवरा यांनी प्रयत्न केले होते. त्यांनी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्याशी संपर्क साधून काँग्रेसच्या घटनेत दुरुस्ती करून मुंबई काँग्रेसला स्वायत्ता मिळवून दिली होती. मात्र, आता पक्षाची कोणतीही घटना दुरुस्ती न करता काँग्रेसने हा निर्णय घेतला असून तसं पाहता हा निर्णयच बेकायदेशीर असल्याचं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे.

हा मुंबई अध्यक्षांचा पंख छाटण्याचा प्रकार

या पूर्वी प्रदेश काँग्रेस आणि मुंबई काँग्रेस यांचा एकमेकांच्या कामात कधीही हस्तक्षेप नव्हता. मुंबई काँग्रेसही प्रदेश काँग्रेसची पॅरंटल बॉडी नव्हती. दोन्ही काँग्रेस स्वायत्त होत्या. उलट मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष हा प्रदेश काँग्रेसचा पदसिद्ध उपाध्यक्ष असतो, असं असतानाही स्क्रीनिंग आणि स्ट्रॅटेजी कमिटीच्या चेअरमनपदी प्रदेशाध्यक्षांना बसवून काँग्रेसने एक प्रकारे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षांची पंखेच छाटली असल्याचं ‘नवभारत टाइम्स’ ज्येष्ठ राजकीय पत्रकार अभिमन्यू शितोळे यांनी सांगितलं.

गटातटाच्या राजकारणाचा परिणाम

मुंबई काँग्रेसमध्ये काम गटातटाचं राजकारण राहिलं आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी कोणीही बसले तरी दुसरा गट त्याचे पाय ओढायचे नेहमीच काम करत आला आहे. या गटातटाच्या राजकारणामुळेच काँग्रेस हायकमांडने ही नवी व्यवस्था केली आहे का? असं म्हणण्याला वाव असल्याचं अभिमन्यू शितोळे यांनी सांगितलं.

भाई जगताप रबर स्टँम्प

काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदाच्या कायम स्पर्धेत असलेल्या भाई जगताप यांना अखेर हे पद मिळाले आहे. बऱ्याच वर्षांच्या प्रतिक्षेनंतर जगताप यांच्या गळ्यात मुंबई अध्यक्षपदाची माळ पडली असली तरी या माळेतील फुलंच काढून घेण्यात आली आहेत. महत्त्वाचे अधिकारच काढून घेतल्याने जगताप हे निव्वळ रबर स्टँम्प बनलेले आहेत, असं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे.

काँग्रेसमध्ये कार्पोरेट कल्चर

भाई जगताप यांना मुंबई अध्यक्षपद देताना काँग्रेसने मुंबई कार्यकारिणीच्या इतर नेमणुकाही केल्या आहेत. पहिल्यांदाच मुंबई काँग्रेस प्रभारी हे पदही निर्माण करण्यात आलं आहे. नाराज काँग्रेस नेत्यांना अॅडजेस्ट करण्याचा हा प्रयत्न असून त्यातून काँग्रेसने एकप्रकारचं कार्पोरेट कल्चरच आणण्याचा प्रयत्न केल्याचंही शितोळे यांनी सांगितलं.

भविष्यात वाद होतील

आज मुंबईसह राज्यात काँग्रेसची राजकीय स्थिती डळमळीत आहे. उद्या राज्यात काँग्रेसने उभारी घेतल्यास स्क्रीनिंग आणि स्ट्रॅटेजी कमिटीतील अधिकारावरून मुंबई काँग्रेस आणि प्रदेश काँग्रेस दरम्यान संघर्ष निर्माण होऊ शकतो, अशी शक्यता दैनिक ‘शिवनेर’चे संपादक नरेंद्र वाबळे यांनी वर्तवली.

असंतुष्टांना खूश करण्यासाठी नवी व्यवस्था

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी अनेक गटतट प्रयत्न होते. त्यातून भाई जगताप यांनी बाजी मारली आहे. गुरुदास कामत आणि मिलिंद देवरा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष असेपर्यंत मुंबई काँग्रेसला पूर्ण स्वातंत्र्य होते. पण त्यांच्यावर चेक द्यायला अनेक नेते होतेच. त्यामुळेच आता जगताप यांच्यावर चेक ठेवण्यासाठी ही व्यवस्था केली असावी. तसेच ज्यांना मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपद मिळू शकलं नाही, अशा काँग्रेसमधील असंतुष्ट गटाला खूश करण्यासाठीही ही व्यवस्था केली गेली असावी, असं मत नरेंद्र वाबळे यांनी व्यक्त केलं. पण भाई जगताप रबर स्टँम्प म्हणून राहणार नाहीत असं वाटतं. आपण रबर स्टँम्प झाल्याचं जगताप यांना वाटल्यास राजीनामा देण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय राहणार नाही, असंही वाबळे यांनी स्पष्ट केलं. (Maharashtra congress president will interfere in mumbai congress?)

सातव यांची खेळी?

मुंबई काँग्रेसच्या स्क्रीनिंग आणि स्ट्रॅटेजी कमिटीच्या चेअरमनपदाची सूत्रे प्रदेशाध्यक्षांच्या हाती देण्यामागे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजीव सातव यांची खेळी असल्याचं सूत्रांनी सांगितलं. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी राजीव सातव यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. हायकमांडही त्याला अनुकूल आहेत. त्यामुळे सातव आगामी काळात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून येऊ शकतात. अशावेळी मुंबई काँग्रेसचं नियंत्रणही आपल्या हातीच राहावं म्हणून त्यांनी ही नवी तरतूद घडवून आणणल्याचं सूत्रांनी सांगितलं. (Maharashtra congress president will interfere in mumbai congress?)

संबंधित बातम्या:

बाळासाहेब थोरातच काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी का?; जाणून घ्या पाच कारणे!

शरद पवार मध्यस्थितीला तयार, पण पर्याय काय त्यांच्यासमोरचे?

मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे ‘एकला चलो रे’?

(Maharashtra congress president will interfere in mumbai congress?)

Published On - 12:21 pm, Mon, 21 December 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI