जळगाव : ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाज आरक्षणापासून वंचित राहिला आहे. फडणवीस सरकारच्या काळात मराठा आरक्षणाच्या संघर्षाला यश आलं होतं. पण, ठाकरे सरकार सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकवण्यात अपयशी ठरले. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ठाकरे सरकार काहीच पावले उचलत नाही. या ढिम्म सरकारला जागं करण्यासाठी 2 सप्टेंबरपासून राज्यव्यापी आंदोलन छेडणार असल्याचा इशारा शिवसंग्राम संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विनायक मेटे यांनी आज दिलाय. ते जळगावात पत्रकार परिषदेत बोलत होते. विधीमंडळ अंदाज समितीच्या दौऱ्याच्या निमित्ताने आमदार विनायक मेटे हे जळगावात आले होते. यावेळी त्यांनी अजिंठा शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षणाबाबत शिवसंग्राम संघटनेची भूमिका मांडली. (Vinayak Mete warns of statewide agitation against state government)