‘मन की बात’ आहे पण मनातलं नाही, मुख्यमंत्री आहेत पण रस्त्यावर नाहीत, मनसेचा केंद्रासह राज्य सरकारवर निशाणा

दुसरीकडे कोरोनासाठी उपयुक्त ठरत असलेल्या रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. (MNS Sandeep Deshpande Tweet on corona situation)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 8:42 AM, 4 May 2021
'मन की बात' आहे पण मनातलं नाही, मुख्यमंत्री आहेत पण रस्त्यावर नाहीत, मनसेचा केंद्रासह राज्य सरकारवर निशाणा
Pm Narendra Modi_Uddhav Thackeray

मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. तर दुसरीकडे कोरोनासाठी उपयुक्त ठरत असलेल्या रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. तर काही ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. तसेच कोरोनावरील लसीची निर्मिती झाली असली तरी तिचाही तुटवडा भासत आहे. यामुळे राज्यातील नागरिक हवालदिल झाले आहे. या सर्व परिस्थितीवरुन मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज्यासह केंद्र सरकारवर टीका केली आहे. (MNS Sandeep Deshpande Tweet on Maharashtra corona situation)

संदीप देशपांडेंचे ट्वीट 

“लसीकरण आहे पण लस नाही. खाटा आहेत पण ऑक्सिजन नाही, उपचार आहे पण औषध नाही, व्यापारी आहे पण व्यापार नाही, लोक आहेत पण नोकरी नाही, मन की बात आहे पण मनातलं नाही, मुख्यमंत्री आहेत पण रस्त्यावर नाहीत, सगळंच रामभरोसे आहे पण त्यात काहीच राम नाही,” असा खोचक टोला संदीप देशपांडेंनी लगावला आहे.

(MNS Sandeep Deshpande Tweet on Maharashtra corona situation)

राज्यातील कोरोनाची स्थिती काय? 

राज्यात काल नव्या कोरोना रुग्णांपेक्षा बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या जवळपास 10 हजारांनी जास्त आहे. त्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. राज्यात काल दिवसभरात 59 हजार 500 कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. तर गेल्या 24 तासांत राज्यात 48 हजार 621 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

राज्यात काल 567 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 40 लाख 41 हजार 158 झाली आहे. तर रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 84.7 टक्क्यांवर पोहोचलं आहे. तर एकूण कोरोना रुग्णांची संख्या 47 लाख 71 हजार 22 वर पोहोचली आहे. राज्यात सध्या 39 लाख 8 हजार 491 जण होम क्वारंटाईन आहेत. तर 28 हजार 593 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात सध्याच्या स्थितीत 6 लाख 56 हजार 870 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

कोरोना लस आणि रेमडेसिव्हीरचा तुटवडा 

राज्यात एकीकडे कोरोना लसीची साठा अपुरा पडत आहे. त्यामुळे अनेक लसीकरण केंद्र बंद झाली आहेत. कोरोनापासून बचाव होण्यासाठी लसीकरण मोहिमेला अधिक गती देण्याची गरज आहे. गेल्या 1 मे पासून 18 वर्षावरील प्रत्येकाला लस देण्यासाठी केंद्र शासनाने परवानगी दिली आहे. कोरोना लसीबरोबरच विविध राज्यांमध्ये रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. तसेच अनेक ठिकाणी रेमडेसिव्हीरचा काळाबाजार सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. (MNS Sandeep Deshpande Tweet on Maharashtra corona situation)

संबंधित बातम्या : 

राज्यात रेमडेसिव्हीरचा इंजेक्शनचा तुटवडा, कुठे काळाबाजार, तर कुठे मेडिकलबाहेर रांगा

Corona Vaccine : देशात कोरोना लसीचा तुटवडा नाही, रेमजेसिव्हीरचं उत्पादन वाढवण्याचे आदेश- डॉ. हर्षवर्धन