काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरुच, मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरांचा राजीनामा

लोकसभा निवडणुकीपूर्वी मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती झालेले मिलिंद देवरा यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. मुंबईतील लोकसभा पराभवाची जबाबदारी स्वीकारत मिलिंद देवरांनी राजीनामा दिला आहे.

काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरुच, मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरांचा राजीनामा
Namrata Patil

|

Jul 07, 2019 | 3:44 PM

मुंबई : लोकसभा निवडणुकीपूर्वी मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती झालेले मिलिंद देवरा यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. मुंबईतील लोकसभा पराभवाची जबाबदारी स्वीकारत मिलिंद देवरांनी राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस नेते राहुल गांधी, अशोक चव्हाणांसह इतर नेत्यांनी लोकसभेच्या पराभवाची जबाबदारी स्विकारत राजीनामा दिला होता. त्यानंतर आता मिलिंद देवरा यांनी राजीनामा दिल्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

मिलिंद देवरा यांनी राजीनामा देताना त्यांनी आगामी विधासभा निवडणुकीपर्यंत मुंबई शहराचे निरीक्षण करण्यासाठी तीन वरिष्ठ नेत्यांची एक कमिटी स्थापना करण्याची शिफारस केली आहे. दरम्यान देवरांना काँग्रेसमध्ये नवी जबाबदारी स्वीकारण्यासाठी दिल्लीला जावं लागणार असल्याने त्यांनी राजीनामा दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेस पक्षाने मिलिंद देवरा यांच्याकडे मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाची धूरा सांभाळण्यास दिली होती. मात्र, निवडणुकीच्या तयारीसाठी त्यांना कमी वेळ मिळाल्याने काँग्रेसला मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांपैकी एकाही जागेवर विजय मिळवून देता आला नाही. त्यामुळे  काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत मिलिंद देवरा यांनी आपल्या मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

महाराष्ट्रात भाजप-शिवसेना आणि वंचित आघाडीचा सामना करणे हे काँग्रेससाठी मोठे आव्हान असल्याचे देवरा यांनी राजीनामा देताना म्हटलं आहे. दिल्लीत 26 जूनला काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मिलिंद देवरा यांची भेट झाली होती. त्यानंतर नुकतंच भिवंडी कोर्टात एका केसच्या सुनावणीसाठी उपस्थित राहण्यासाठी राहुल गांधी महाराष्ट्रात आले होते. त्यावेळीही देवरा यांनी राहुल गांधीची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी राजीनामा दिला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच मिलिंद देवरा यांनी राजीनामा देण्याआधी त्याबाबतची माहिती मल्लिकार्जुन खर्गे, के.सी.वेणुगोपल यांसहकाँग्रेसच्या दिल्लीतील प्रमुख नेत्यांना दिली होती.

मिलिंद देवरा हे माजी केंद्रीय मंत्री असून, माजी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांचे सुपुत्र आहेत. दक्षिण मुंबईत 2014 साली शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी मिलिंद देवरा यांचा पराभव केला होता. त्याआधी मिलिंद देवरा यांनी दक्षिण मुंबईचं प्रतिनिधित्व केलं होतं. यंदाही काँग्रेसकडून मिलिंद देवरा दक्षिण मुंबईतून रिंगणात उतरले होते. मात्र यंदाच्या निवडणुकीतही त्यांचा दारुण पराभव झाला होता.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें